... आता तुमचे हॉटेलच सील करतो म्हणत मावळ तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 06:50 PM2020-10-14T18:50:09+5:302020-10-14T18:52:19+5:30
हाॅटेलमध्ये कोरोना विषाणूचे पालन न करण्यात आल्याने तुमचे हाॅटेल सील करण्यात येणार आहे,असे सांगून १० हजार लुबाडले.
वडगाव मावळ : कोरोनाच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन केले नाही. आता तुमचे हाॅटेलच सील करतो असे सांगत पोलीस निरीक्षकाचा ड्रेस घालून आणि कमरेला गोळ्या नसलेले रिव्हॉल्वर लावून ते दोघे मावळ तालुक्यातील अनेक हाॅटेल व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करत होते. अखेर या तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकासह त्याच्या चालकाला वडगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
नवनाथ शिवाजी बोऱ्हाडे (वय २६ रा. ब्राह्मणवाडी) या हाॅटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली. याप्रकरणी जुबेर हुसेन शेख (वय ३० रा. तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे) , प्रशांत किसन गरूड (वय ३६ रा. घोरावाडी, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या तोतया पोलिसांची नावे असून न्यायालयाने १७ तारखेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.१० रोजी दुपारी बाराच्या सुमारास वडगाव हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील माणुसकी हाॅटेलमध्ये जुबेर हुसेन शेख हा अल्टोकार (एमएच १४. डीए. ५९४१ ) मधून गेला. तिथे त्याने मी नार्कोटिक विभागाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक असून तुमच्या हाॅटेलमध्ये कोरोना विषाणूचे पालन न करण्यात आल्याने हाॅटेल सील करण्यात येणार आहे, असे सांगितले. अन्यथा माझ्याकडे जी कागदपत्रांची फाईल आहे. त्यावर दहा हजार ठेवा असे म्हणाला. यानंतर हाॅटेल मालक याने त्याला दहा हजार दिले.पैसे घेऊन ते दोघेही निघून गेले.
.................
.... आणि तोतया गजाआड....
याबाबत काही हाॅटेल मालकांनी मंगळवारी रात्री पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक दिलीप देसाई, संतोष माने, मनोज कदम, गणेश तावरे, दिपक गायकवाड, शैलेश कंटोळी यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. एकतर लाॅकडाऊन मुळे पाच महिन्यापासून हाॅटेल बंद होती.त्यामुळे हाॅटेल व्यवसायिक त्रस्त झाले होते.त्यात हाटेल सुरू झाल्यावर ही फसवूक झाली. या दोघांनी वडगाव तळेगाव एमआयडीसी परिसरातील अनेक हाॅटेल मालकांना गंडा घातला असून ज्यांची फसवणूक झाली त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.
.............................
साहेब मला मारू नका मीच गुन्हा केलाय...
बुधवारी रात्री जुबेर शेख याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करताना तो म्हणाला मी शासकीय नोकर आहे. तर हाॅटेल मालक म्हणायचे हाच तो पैसे नेणारा. शेवटी पोलिसांनी आतल्या खोलीत घेऊन खाक्या दाखवायला सुरवात केली. त्यावर तो म्हणाला, साहेब मला मारू नका.. मीच गुन्हा केला आहे