आता शोध रिक्षातळाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:18 AM2018-11-13T00:18:47+5:302018-11-13T00:19:06+5:30
परमिट झाले खुले : पिंपरी-चिंचवड शहरात पाच हजार रिक्षांसाठी दोनशे तळ
पिंपरी : तब्बल १५ वर्षांनी रिक्षांचे परमिट खुले झाले. शहरात पाच हजार परमिटचे वाटप झाले. कर्ज काढून रिक्षा घेतल्या. व्यवसायासाठी रिक्षा बाहेर काढल्या. पूर्वीच्या रिक्षातळांवर आगोदरच अधिक रिक्षा थांबत असताना, त्यात नव्याने परमिट घेतलेल्यांच्या रिक्षांची भर पडली असून, नव्या रिक्षाचालकांना सामाऊन घेताना कुरबुर होऊ लागली आहे. नव्याने परमिट मिळविलेल्या रिक्षाचालकांना आता रिक्षातळासाठी शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.
वर्षभरापासून मात्र नव्याने परमिट मिळालेल्यांच्या रिक्षा रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. त्यामुळे रिक्षातळांवर रिक्षांची गर्दी वाढू लागली आहे. आपल्या व्यवसायात वाटेकरी नको, म्हणून रिक्षातळावरील काही रिक्षाचालक नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षाचालकांना रिक्षातळावर थांबण्यास मज्जाव करू लागले आहेत. यापूर्वी पुण्यातून प्रवासी घेऊन आलेल्या रिक्षाचालकाला शहरातील कोणत्याही रिक्षातळावर थांबू दिले जात नसल्याने प्रवाशाविना रिकामी रिक्षा न्यावी लागत असे. अशीच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांवर पुण्यात गेल्यानंतर ओढवते. पिंपरी-चिंचवड शहरात धावणाऱ्या रिक्षांपैकी बहुतांशी रिक्षा या बिगर परमिटच्या होत्या. एकाच परमिटवर अनेक रिक्षा धावत होत्या. परमिट एकाचे रिक्षा दुसºयाची ही वस्तुस्थिती सर्रास निदर्शनास येत होती. परमिटधारक स्वत: रिक्षा चालवत नव्हते. विशिष्ट कालावधीसाठी ठरावीक रक्कम घेऊन प्रतिज्ञापत्रावर करारनामा लिहून घेऊन परमिटधारक त्यांच्याकडील परमिटची रिक्षा दुसºयाला चालविण्यास देत. अनेक जण रोज ४०० ते ५०० रुपये या प्रमाणे रक्कम घेऊन शिफ्टवर रिक्षा देत असत.
रिक्षातळावर थांबण्यास जागा मिळत नसल्याने नव्याने परमिट मिळालेले अनेक रिक्षाचालक शहरभर फिरून व्यवसाय करू लागले आहेत. रिक्षातळावर जागा मिळावी, सन्मानाने व्यवसाय करता यावा.
रिक्षामुक्त चौक उपक्रम
शहरातील बहुतांशी रिक्षातळ हे वर्दळीच्या ठिकाणी अथवा प्रमुख चौकात आहेत. अशा रिक्षातळांवरील अनेक रिक्षा रस्त्यात मध्येच उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रवासी मिळण्याच्या अपेक्षेने रिक्षाचालक मध्येच कोठेही रिक्षा थांबवतात, त्यामुळे अपघात घडून येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रिक्षामुक्त चौक ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चौकात, वर्दळीच्या ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणाºया रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. प्रवाशांना सोईस्कर ठरेल अशाच ठिकाणी रिक्षातळ असावेत, परंतु रिक्षाचालकांनी वाहतुकीची शिस्त पाळणे गरजेचे आहे. तेथे थांबण्यास विरोध नाही, रहदारीस अडथळा ठरेल, अशी कृती करणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे धोरण वाहतूक विभागाने अवलंबले आहे.
नव्या परमिटधारकांचीही सोय व्हावी
शहरात पाच हजार परमिटची आवश्यकता होतीच, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) परमिटचे वाटप केले. यापुढे आणखी परमिटचे वाटप करण्याची आवश्यकता नाही. नव्याने परमिट मिळालेल्या रिक्षांनाही त्या त्या भागातील रिक्षातळांवर सदस्यत्व दिले जात आहे. केवळ रिक्षातळच नाही तर त्यांना शहरातील शेअर ए रिक्षाचे १६ मार्ग आहेत, त्या मार्गांवरही व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहे. तेथेही त्यांना सामाऊन घेतले जाईल. परमिटधारक रिक्षांची संख्या वाढली आहे. आणखी ६० ते ७० ठिकाणी रिक्षातळांसाठी जागा उपलब्ध व्हावी. आणखी रिक्षातळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा संघटनांच्या वतीने आरटीओ कार्यालयाकडे केली आहे. रिक्षामुक्त चौक ही वाहतूक विभागाची संकल्पना रिक्षाचालकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे.
- बाबा कांबळे, अध्यक्ष,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत