'आत्ता' झोपलेले कायमचे झोपतील ; अफवेने पुणेकरांची गाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:53 PM2020-03-26T16:53:43+5:302020-03-26T16:59:36+5:30
आपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला.
पुणे (वाकड) : पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रावर अद्यापही अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. आपल्या पिढीने शिकुन संगणक, आधुनिक टेक्नॉलॉजी,विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली मात्र असे असूनही अंधश्रद्धेने आपली पाठ अद्याप सोडली नसल्याचा प्रत्यय गुरुवारी पहाटे पुणेकरांना आला.
गुरुवारी (दि २६) पहाटे ३ ते ४ च्या सुमारास मराठवाडाकरांनी पुणेकरांची गोड साखर झोप मोडून अक्षरशः रात्र जगात काढायला भाग पाडले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातून पुण्यात स्थायिक झालेल्या बहुतेक पुणेकरांचे मध्यरात्री अचानक फोन खनाणले. लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, सोलापूर, किल्लारी, माकणी, सास्तुर, उदगीर, निलंगा यासह अन्य भागातील नातेवाईकांनी आता लगेच सर्वजण उठून बसा, सर्वांना उठवा, लातूर मधील एका सरकारी रुग्णालयात आताच एका स्त्रीच्या पोटी माकडासारखे दिसणारे स्त्री जातीचे अर्भक जन्माला आले अन ते जन्मताच बोलु लागले...जे झोपलेत ते कायमचे झोपतील, भुंकप होईल आणि जे उठलेत तेच जिवंत राहतील असे म्हणून ते बाळ व त्याची आई मरण पावली. त्यामुळे कोणीही झोपू नका हे खोटं वाटत असेल तर व्हाट्स ऍपवर फोटो पाठवतो ते बघा असे म्हणून काही फोटो पाठविले गेले. पण प्रत्यक्षात ते फोटो बारकाईने पहिले तर त्यावर या महिन्या तील १९ तारीख दिसते तर फोटोत रुग्णालय आवारात दिसणारे सूचना व माहिती फलक हे हिंदीमध्ये असल्याने हे फोटो आणि रुग्णालय उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यातील असण्याची दाट शक्यता आहे मात्र तरीही कुठलाही मागचा पुढचा विचार न करता लोकांनी ह्या फोटोसह अफवा पसरवीली. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा मध्यरात्री जागा झाला सर्वांनी अंगणात येऊन गप्पाचे फड रंगवीत रात्र घालविली.
इकडे पुणेकरांचे देखील वेगळे हाल नव्हते. गावाकडील तसेच पुण्यातील नातेवाईक मित्र मंडळींनी एकमेकांना अती काळजीपोटी फोन करून जागते रहोचा सल्ला दिल्याने धीर गंभीर वातावरणात असंख्य पुणेकर देखील अंथुरणात उठून बसले, जागे झाले. कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन असलेल्या पुणेकरांना मोबाईल आणि टीव्ही शिवाय सध्या पर्याय नाही त्यामुळे दिवसभर कोरोना आणि फक्त कोरोनाच त्यावर हे करू नका ते करू नका याच्या भडिमारात दिवस काढावा लागतो मात्र या अफवेच्या भीतीने पूरती गाळण उडलेल्या पुणेकरांना अक्षरशः रात्रही जागून काढण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे अशा अफवा व अंधश्रद्धा पसरविनाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.