आता तळवडेला धास्ती; चिखली-कुदळवाडीच्या कारवाईनंतर नवा भाग रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:10 IST2025-02-15T12:06:54+5:302025-02-15T12:10:33+5:30
ज्योतिबानगरचे लघुउद्योजक मानसिक तणावात

आता तळवडेला धास्ती; चिखली-कुदळवाडीच्या कारवाईनंतर नवा भाग रडारवर
- रामहरी केदार
चिखली : चिखलीच्या कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर आठवड्याभरात जोरदार कारवाई सुरू आहे. या परिसरात अनेक उद्योजक आस्थापनांच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार देत होते; मात्र, महापालिका प्रशासनाने कारवाई केल्याचा परिणाम अनेकांच्या उपजीविकेवर झाला आहे. यानंतर आता चिखली परिसराला लागूनच असलेल्या तळवडेतील ज्योतिबानगर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनीही कारवाईची धास्ती घेतली आहे.
तळवडे परिसरातदेखील कारवाई होण्याच्या अफवा काही नागरिक पसरवत आहेत. या परिसरात कारवाई कधी व कोणत्या निकषाला अनुसरून होणार आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसताना पसरविलेल्या अफवा उद्योजकांसाठी तणावाचे कारण ठरत आहेत.
तळवडे परिसरातील नवीन पत्रा शेडना नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. कारवाईसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतो. परिसरात कुणीही अफवा पसरविण्याचे काम करू नये, महापालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणानुसार कारवाई करण्यात येत आहे. - श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी, ‘फ’ प्रभाग
तळवडे परिसरातील उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अजूनपर्यंत तरी कुठल्या उद्योजकांना अनधिकृत बांधकामाची नोटीस आल्याची माहिती संघटनेकडे नाही. सर्व उद्योजकांच्या पाठीशी संघटना ठाम उभी आहे. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
लघुउद्योजकांनी या कारवाईविरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे. प्रशासनाकडून करण्यात येणारी कारवाई अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे. या कारवाईपूर्वी या उद्योजकांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने मानवनिर्मित आपत्ती निर्माण केल्याने अनेकजण भयभीत झाले आहेत. - गोरख भोरे, उद्योजक, तळवडे
तळवडे परिसर आणि अर्थचक्र
ज्योतिबानगर, गणेशनगर, तळवडे गावठाण, बाठेवस्ती, त्रिवेणीनगर यासह एमआयडीसीचा माहिती-तंत्रज्ञान पार्क यांचा समावेश तळवडे औद्योगिक वसाहतीत होतो. या परिसरात फॅब्रिकेशन, प्रेसिंग, पेंटिंग, मशिनिंग यासह मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या मालाचा पुरवठा करणारे शेकडो उद्योग आहेत. या उद्योगांचे अर्थचक्र मोठ्या आस्थापनांवर अवलंबून आहे.
तीन हजारांवर लघुउद्योग
तळवडे परिसरात अंदाजे तीन हजारांहून अधिक लघुउद्योग अस्तित्वात आहेत. या उद्योगांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या परिसरात कारवाई झाली तर हजारो कुटुंबीय उघड्यावर येण्याची भीती आहे.
रेड झोन
तळवडेच्या हद्दीत पूर्वी संरक्षण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने या परिसराला ‘रेड झोन’ घोषित केले आहे. संरक्षण खात्याअंतर्गत येणाऱ्या जमिनी गृहीत धरून तळवडेचा परिसर एक हजाराहून अधिक एकरवर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. यामध्ये दोनशे एकरपेक्षा अधिक परिसरावर औद्योगिक आस्थापना असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
यांना मिळाल्या नोटिसा
तळवडे व चिखलीलगतच्या परिसरातील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकामांना अनधिकृत असल्याच्या नोटिसा दिल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.