पिंपरी-चिंचवड शहरात कॉलरा रूग्णांची संख्या सातवर; शनिवारी एकाच दिवशी आढळले चार रूग्ण
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: June 15, 2024 10:09 PM2024-06-15T22:09:42+5:302024-06-15T22:09:57+5:30
भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली.
पिंपरी : महापालिकेकडून दूषित व गढूळ पाणीपुरवठा झाल्याने भोसरी परिसरातील तीन रुग्णांना पटकीची (काॅलरा) लागण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि.४) चार जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर वायसीएम आणि भोसरी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रूग्णांची संख्या सातवर पोहचली असून सर्वच रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
भोसरी येथील धावडे वस्ती परिसरात महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या जलवाहिनीतून एका नागरिकाने नळजोड घेतले होते. मात्र, नळजोड घेताना खबरदारी न घेतल्यामुळे वाहिनीला गळती झाली. यातून दूषित पाणीपुरवठा होऊन संबंधित परिसरातील रुग्णांना काॅलराची लागण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. परिसरात महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे.
२६ हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण पुुर्ण..
महापालिकेच्या वतीने दोन सदस्य असलेल्या ४४ टीम्स मार्फत घरोघरी साथरोगाचे सर्व्हेक्षण सुरू आहे. आतापर्यंत ९ हजार ७०५ घरामधून २६ हजार ५५१ नागरिकांचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. तसेच संशयित नागरिकांचे नमुने घेवून प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. पॉझिटीव्ह रूग्णांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना ओआरएस व औषधांचे वाटप केले आहे.
धावडे वस्तीत फिल्ड दवाखाना...
संशयित रूग्णांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने धावडे वस्तीतील भैरवनाथ शाळेत फिल्ड दवाखाना स्थापन करण्यात आला आहे. या दवाखान्यात संशयित रूग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास भोसरी रूग्णालयात पाठविण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना या विषयी माहिती व्हावी, यासाठी परिसरात पथनाट्य तसेच रिक्षावर माईक लावून जनजागृती करण्यात येत आहे. -
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य-वैदयकीय अधिकारी, महापालिका