आॅनलाइन कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:53 AM2018-03-16T00:53:13+5:302018-03-16T00:53:13+5:30
माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने आॅनलाइन कर भरण्यास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक प्राधान्य देत आहेत.
पिंपरी : माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असल्याने आॅनलाइन कर भरण्यास पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक प्राधान्य देत आहेत. आजपर्यंत ३९१ कोटींचा करभरणा झाला असून, त्यापैकी १३८ कोटी रुपयांचा कर नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने भरला आहे. एक लाख वीस हजार म्हणजे ३५ टक्के नागरिकांनी आॅनलाइन करभरण्यास प्राधान्य दिले आहे. गत वर्षाच्या तुलनेत आॅनलाइन भरण्यात दुप्पट वाढ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २२ लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरनिर्माण अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाण पूल शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयीसुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे शहराचा लौकिक वाढला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर गृहसंकुलांची निर्मिती होत आहे. मालमत्ताकर भरणा वाढला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी आणि मिळकत कराचा भरणा आॅनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा सात वर्षांपूर्वी सुरू झाली. त्याविषयी जनजागृती केल्याने आॅनलाइनला प्राधान्य मिळू
लागले आहे. यात वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याने प्राधान्य दिले जात असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.
महापालिकेत आजअखेरपर्यंत ३९१.११ कोटींचा मिळकत कर भरणा झाला आहे. त्यापैकी १३८.२१ कोटीचा भरणा आॅनलाइन पद्धतीने झाला आहे. महापालिका परिसरातील नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरातील विविध भागांत पंधरा करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. भरणा वाढला आहे, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
>थकबाकीदार नागरिकांना नोटीस
पिंपरी : शास्तीकराने नागरिक बेजार झाले असताना मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असणाºया मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकतकर भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले. महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न राज्यभर गाजल्याने अनधिकृत बांधकामांना शास्ती लावली होती.
अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचे धोरण मंजूर केले असले तरी जाचक अटीमुळे फक्त नऊ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान मार्च अखेरमुळे मिळकतकर विभागाने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पूर्वीच्या नोटिसा बजाविल्यानंतरही सात दिवसांचे आत मिळकतकराची रक्कम भरणा केलेली नाही, अशा मिळकतधारकांवर मिळकत जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी २०१८
अखेर ज्या मिळकतधारकांकडे रक्कम रुपये पाच हजारांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा एक लाख १३ हजार ३७२ मिळकतधारकांना मिळकतकर भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. जे मिळकतधारक नोटीस बजावूनही थकबाकी भरणार नाहीत, अशा मोठ्या थकबाकीदार मिळकतधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई
करण्यात येत आहे.
दोन लाख ७८ हजार मिळकतधारकांनी ३८० कोटी ४३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख १८ मिळकतधारकांनी आॅनलाइन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे.