प्रवाशांचा जीव टांगणीला, पादचारी पुलांची संख्या अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:19 AM2017-10-02T03:19:58+5:302017-10-02T03:20:13+5:30
रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांची अपुरी संख्या, यासह पूल आहेत; मात्र त्याची झालेली दुरवस्था, कमी असलेली रुंदी, रखडलेली पादचारी पुलांची कामे, यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे.
पिंपरी : रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांची अपुरी संख्या, यासह पूल आहेत; मात्र त्याची झालेली दुरवस्था, कमी असलेली रुंदी, रखडलेली पादचारी पुलांची कामे, यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. तसेच अग्निशामक यंत्रणेची कमतरता, स्थानकात जाणाºया आणि बाहेर पडणाºया ठिकाणीच झालेली अतिक्रमणे यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, यामुळे प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान रेल्वे प्रवासासह रेल्वे स्थानकांवर सुरक्षितता कधी अनुभवयास मिळणार, असाही सवाल पिंपरी-चिंचवडसह परिसरातील प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील रेल्वे पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खडकी ते लोणावळा या रेल्वे स्थानकावरील परिस्थितीचा घेतलेला आढावा.
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचवड रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे स्टेशन आहे. अनेक लांबपल्ल्याच्या गाड्यांचा येथे थांबा असल्याने या स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. येथील वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन नवीन पादचारी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सध्या हे काम अनेक वर्षांपासून बंद पडल्याने प्रवाशांना जुन्या पुलाचा वापर करावा लागत आहे. या स्टेशनवर अनेक समस्या असल्याने प्रवासी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
रेल्वे प्रवासात अनेकदा अपघाताच्या व चोरीच्या घटना घडतात़ मात्र, अशा प्रसंगी प्रवाशांना योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करीत आहेत. चिंचवड स्टेशनवर चार फलाट आहेत. या स्टेशनवर अनेक कामगारवर्ग,
विद्यार्थी व इतर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे. येथे असणाºया पादचारी पुलावर शेडसाठी सांगाडे उभारण्यात आले. मात्र, पत्रे टाकले नसल्याने ऊन, वारा व पावसाचा सामना प्रवाशांना करावा लागतो. येथील वर्दळ पाहता सध्याचा जुना पूल धोकादायक ठरत आहे.
येथील प्रवासी संख्या विचारात घेऊन नवीन पादचारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, याबाबत नियोजन चुकल्याने हे काम अनेक वर्षांपासून बंद आहे. स्टेशनवर पुरेशी अपात्कालीन व्यवस्था उपलब्ध नाही. प्रवाशांना अपघात प्रसंगी वेळेवर मदत मिळत नसल्याचे दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी सांगत आहेत. येथील नवीन पादचारी पुलाचे काम सुरू करावे. प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. ‘‘चिंचवड रेल्वे स्टेशनवर प्रवासी संख्या वाढत आहे. मुंबईकडे नियमित प्रवास करणाºयांची संख्या ही मोठी आहे. मात्र, स्टेशनवर अनेक समस्या आहेत. पादचारी पुलाचा प्रश्न गंभीर आहे. याचबरोबर अपघात प्रसंगी वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नाहीत. स्टेशनवर पाकीटमार ही नेहमीची समस्या आहे. मात्र, रेल्वे पोलीस प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याने प्रवाशांना याचा त्रास होतो. सकाळी मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची मोठी गर्दी असते. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांसाठी अर्धा डबा राखीव आहे. प्रवासी संख्या पाहता पूर्ण डबा राखीव करणे गरजेचे आहे. मात्र, प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन होत नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे,’’ असे चिंचवड-मुंबई प्रवासी संघाचे भाईजान मुलाणी यांनी नमूद केले.
तळेगाव दाभाडे : येथे केंद्रीय संरक्षण विभागाचा डेपो असल्याने मालवाहतूक व कर्मचाºयांच्या प्रवासासाठी तळेगाव रेल्वे स्थानक व घोरावाडी रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुका व नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग यांचे मुंबईशी दळणवळण सोईचे व्हावे तसेच आॅर्डनन्स डेपोच्या (डीओडी) कर्मचाºयांच्या प्रवासाची सोय व्हावी या उद्देशाने ब्रिटिशकाळात या दोन्ही स्थानकांची निर्मिती झाली.
उत्पन्नाच्या दृष्टीने ही दोन्ही स्थानके आघाडीवर असूनही सेवासुविधांबाबत मात्र पिछाडीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने येथील सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी मावळ तालुका रेल्वे प्रवाशी संघाचे अध्यक्ष पोपट भेगडे, उपाध्यक्ष माजी नगराध्यक्षा मीरा फल्ले व पदाधिकारी यांनी केली आहे. तळेगाव रेल्वे स्थानकावर दोन्ही फलाटांना जोडणारा एकच पादचारी पूल आहे. हा पादचारी पूल पुढे यशवंतनगर भागास जोडल्यास प्रवाशांची सोय होईल, अशी माहिती तळेगाव स्टेशन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय मुनोत यांनी दिली. एकच पादचारी पूल असल्याने प्रवाशांची एकदम गर्दी होते. या गर्दीला वैतागून व जवळचा मार्ग म्हणून अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. विशेष म्हणजे या पादचारी मार्गावर छत नाही. छत नसल्याने प्रवाशांचे उन्हाळ्यात हाल होत आहेत. शिवाय काही ठिकाणी कडेला गवतही उगवले आहे. छताअभावी प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करावा लागतो. घोरावाडी रेल्वे स्थानकावरील असलेला पादचारी पूल जास्त
उंचीवर असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने तो निरूपयोगी आहे. वृद्ध प्रवाशांना हा पूल कर्दनकाळ वाटतो. हा पादचारी पूल चढताना वृद्धांची दमछाक होते. सध्या हा पादचारी मार्ग म्हणजे जुगार व दारूड्यांचा अड्डा बनला आहे. मोकाट कुत्र्यांची व चोरट्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. हा पादचारी पूल सदोष असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये -जा करतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
लोणावळ्याहून पुण्याकडे जाताना विरुद्ध दिशेला असलेला प्लॅटफॉर्म ही घोरावडी या स्थानकाची ओळख! हा प्लॅटफॉर्म आजतागायत हजारो प्रवाशांचा कर्दनकाळ ठरला आहे. ‘फ्लॅग स्टेशन’ म्हणून असलेला दर्जा हा या स्थानकासाठी शाप ठरला आहे.
पिंपरी : येथील रेल्वे स्थानकावर पादचारी पूल असतानाही अनेक प्रवासी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडतात. पिंपरी येथे मोठी बाजारपेठ असल्याने नेहमीच या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. तसेच शाळा, महाविद्यालय, भाजी मार्केट, मावळ भागातूनही अनेकजण पिंपरीत येत असतात.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर पादचारी उभारण्यात आले आहेत. तरीही पुलावरून न जाता लोहमार्ग ओलांडतात. त्यामुळे अपघाताचा धोका आहे. तर सध्याच्या पुलांबाबत प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने या पुलांवर नेहमीच मद्यपी, भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे देखील अनेकजण पुलावरून जाणे टाळत असल्याचे दिसून येते.