मतदार संख्या साडेतेरा लाख
By admin | Published: September 2, 2016 05:45 AM2016-09-02T05:45:01+5:302016-09-02T05:45:01+5:30
गत महापालिका निवडणुकीवेळी फेब्रुवारी २०१७मध्ये मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८८ इतकी होती. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मिळून
पिंपरी : गत महापालिका निवडणुकीवेळी फेब्रुवारी २०१७मध्ये मतदारसंख्या ११ लाख ५२ हजार ५८८ इतकी होती. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मिळून सुमारे दीड लाख मतदार वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाापालिका निवडणुकीवेळी शहरातील मतदार संख्या साडेतेरा लाखांच्या घरात पोहोचणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत, सुनावणीचा कार्यक़्रम जाहीर झाला आहे. अनुसूचित जाती, जमाती आरक्षित प्रभागासह प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही बुधवारी ७ सप्टेंबरला होणार आहे. हा प्रस्ताव विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत तपासणी करून १२ सप्टेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०१७ला ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर महापालिकांची निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभारचना, सोडत, सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावास २३ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोग मान्यता देईल.
४ आॅक्टोबरला अनुसूचित जाती, जमाती, महिला व अन्य आरक्षणाची सोडत काढण्यासाठी महापालिका आयुक्तांमार्फत जाहीर नोटीस
प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला आदींची सोडत ७ आॅक्टोबरला काढली जाईल. १० आॅक्टोबरला सोडतीनंतर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. (प्रतिनिधी)
- सन २०११ चे लोकसंख्येवर प्रभाग रचना करण्यात येणार असून, सन २०११ ची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या २,७३,८१० (१५.८४%) व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३६,५३५ (२.११%) ग्राह्य धरण्यात येणार असून, अनुसूचित जाती करिता २० जागा अनुजमाती करिता ३ जागा व नागरिकांचा मागासप्रवर्गाकरिता ३५ जागा राखीव राहतील.
महापालिका आयुक्त १० आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबरपर्यंतचा कालावधी सूचना, हरकतींसाठी जाहीर करतील. राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या सूचना, हरकतींवर ४ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होईल. सुनावणी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी नमूद करून महापालिका आयुक्त १० नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयुक्त अथवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करतील. राज्य निवडणूक आयुक्त २२ नाव्हेंबरला प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त हरकती, सूचनांचा विचार करून निर्णय देतील. सुनावणीनंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभागरचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करून प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना २५ नोव्हेंबरला महापालिका आयुक्तांमार्फत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.