उमेदवारीसाठी ‘ओबीसी’ आक्रमक
By admin | Published: January 23, 2017 02:56 AM2017-01-23T02:56:57+5:302017-01-23T02:56:57+5:30
आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत वडगाव गणात सर्व राजकीय पक्षांत ओबीसी समाजाचे प्रबळ उमेदवार असतानाही खऱ्या
वडगाव मावळ : आगामी पंचायत समितीच्या निवडणुकीत वडगाव गणात सर्व राजकीय पक्षांत ओबीसी समाजाचे प्रबळ उमेदवार असतानाही खऱ्या ओबीसींना डावलून अलीकडे दाखल मिळविलेल्या कुणबींना उमेदवारी देण्याच्या तयारीत सर्वच प्रमुख
राजकीय पक्ष असल्याने ओबीसी समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. याबाबत ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेत ओबीसी समाजातील उमेदवारांना तिकीट दिले नाही, तर आगामी निवडणुकीत सर्वच पक्षांना ओबीसीच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच दिला आहे.
रविवारी येथे वडगाव गणातील ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. कार्यकर्त्यानी सर्वच पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत ओबीसी कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली. रविकांत रसाळ, दत्तात्रय माळी, विवेक गुरव, भरत कोकरे, सुदेश गिरमे, अंकुश देशमुख, अरुण वाघमारे, अनिता गुरव, सोमनाथ धोगडे आदींनी मार्गदर्शन केले. मधुकर वाघवले, मुकुंद भालेकर, बाळासाहेब भालेकर, विलास भोकरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, दिलीप आंनदे, रमेश सुतार, नंदकुमार गाडे, बाळासाहेब बोरावके, समीर दौंडे, स्वप्निल भुजबळ, विनायक लोकरे, रोहीत गिरमे, चेतन घाग, संजय वाघवले, सागर वारुळे, संजय लोणकर, बाळासाहेब दळवी आदी उपस्थित होते.
वडगाव गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राखीव असून, सभापतिपद ओबीसीसाठी राखीव असल्याने सर्वच पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सर्वच पक्षात या गणातून कुणबी उमेदवारीसाठी इच्छुक झाल्याने सर्वच पक्षातील ओबीसी इच्छुक उमेदवारानी नाराजी व्यक्त करुन पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले नाहीत. परंतु सर्वच पक्षात ओबीसीत प्रबळ उमेदवार नाहीत असा प्रचार होत असल्याने या बैठकीत सर्वच पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या गोष्टीचा विचार सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला नाही, तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)