जन्म-मृत्यू ऑनलाइन सुविधेच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 01:53 AM2019-01-26T01:53:28+5:302019-01-26T01:53:35+5:30
ऑनलाइन सुविधा देता यावी, याकरिता ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदेबद्दल जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी आक्षेप नोंदविला आहे.
पिंपरी : महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचे कामकाज संगणकीकृत व्हावे, त्याचबरोबर ऑनलाइन सुविधा देता यावी, याकरिता ठेकेदारांनी सादर केलेल्या निविदेबद्दल जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमर कापसे यांनी आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील नोंदणी प्रक्रियेसाठी आॅनलाइन संगणकप्रणाली वापराकरिता शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन होणे अपेक्षित होते. पिंपरीतील शुभम उद्योग या कंत्राटदाराने या अटी, नियमांचे पालन केले आहे का, याबद्दल जाणीव फाउंडेशनतर्फे महापालिकेला लेखी निवेदन देऊन खुलासा मागविला होता. मात्र महापालिकेने तो केला नाही.
महापालिकेच्या करारनाम्यातील काही अटी, शर्तींचा भंग करून मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. शुभम उद्योग या कंत्राटदाराशी ८६ लाखांचा करारनामा करण्यात आला. त्यास कापसे यांनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेने दखल न घेतल्याने आपण न्यायालयात धाव घेतली, असे कापसे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी प्रशासनाला न्यायालयात बाजू मांडावी लागणार आहे.