पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:06 PM2020-01-02T17:06:10+5:302020-01-02T18:28:55+5:30
सेवा लवकर सुरू करण्याच्या सूचना
पिंपरी : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गासाठी नवीन डबे आले आहेत. या कामाची पाहणी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सेवा लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील मेट्रोच्या कामास वेग आला आहे. दापोडी ते पिंपरीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी नवीन डबे दाखल झाले आहेत. या कामाची पाहणी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, नागरसेविका सुजाता पालांडे, उप अभियंता बापूसाहेब गायकवाड, मेट्रोचे पी.आर.ओ. रिटायर कर्नल नितिन जोशी, मेट्रोचे उप सुरक्षा अधिकारी गोरख भावसार आदी उपस्थित होते. वल्लभनगर येथील स्टेशनचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या.
स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, शहर परिसरात मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गासाठी नवीन डबे आले आहेत. या कामाची पाहणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मेट्रोला पूर्णपणे सहकार्य केले जात आहे.