दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी हाॅटेलमालकासह मॅनेजरवर गुन्हा; सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 03:56 PM2020-12-02T15:56:28+5:302020-12-02T15:56:59+5:30
चारचाकीसह १० लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : दारुच्या अवैध विक्रीप्रकरणी हाॅटेलमालकास मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चारचाकीसह रोकड, मोबाईल फोन व देशी विदेशी दारुच्या बाटल्या असा १० लाख ३६ हजार ८८८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. देहू-आळंदी रोडलगत, मारुतीनगर, विठ्ठलवाडी येथे मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.
हाॅटेलमालक सुनील धनराज पाटील (वय २५, रा. आंबेठाण, चाकण, ता. खेड) व हॉटेल मॅनेजर भगवान सुरेश पाटील (वय ३०, रा. हॉटेल एम. एस. तुळसाई, पुणे) अशी आरोपी यांची नावे असून, देहूरोड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. देहू - आळंदी रोडलगत, मारूतीनगर, विठ्ठलवाडी येथील हॉटेल एम. एस. तुळसाई येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारू तसेच बियरची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. चारचाकी वाहनातून एक इसम देशी विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्यांचे बॉक्स हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याचे त्यावेळी पोलिसांना दिसले.
चारचाकी वाहनात तसेच एम. एस. तुळसाई हॉटेलवर खालील वर्णनाचा मुद्देमाल घटनास्थळावर मिळून आला. दोन हजार ३०० रुपयांची रोकड, १० हजार रूपये किमतीचा एक मोबाईल, १० लाख रुपये किमतीची चारचाकी तसेच २४ हजार ५८८ रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या, असा एकूण १० लाख ३६ हजार ८८८ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, सहायक फौजदार विजय काबंळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, अमोल शिंदे, गणेश करोटे, मारूती करचुंडे, योगेश तिडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.