इंडस्ट्रियल टाऊनशिपचा प्रस्ताव कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:23 AM2018-12-14T03:23:22+5:302018-12-14T03:23:48+5:30
अंमलबजावणीची बारा वर्षांपासून प्रतीक्षा
वडगाव मावळ : तळेगाव औद्योगिक वसाहतीत शासनाने १९९८ मध्ये १४६२ एकर जमीन खरेदी केली होती. येथे औद्योगिकनगर (इंडस्ट्रियल टाऊनशिप) उभारण्याची घोषणा १२ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने ही घोषणा कागदावरच फिरत राहिली.
मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे, आंबी, बदलवाडी, कातवी या ठिकाणी १४६२ एकर जागा शासनाने संपादित केली आहे. त्यातील ६०० एकर जमीन फ्लोरिकल्चर पार्कसाठी, तर ८०० एकर जमीन उद्योगधंद्यासाठी वापरण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या भागात जनरल मोटर्स जेसीबी, महिना बेरिंग, फासको, हुसको अशा छोट्या-मोठ्या सुमारे तीस कंपन्या आहेत. याखेरीज एमआयडीसीकडे फ्लोरिकल्चर व अन्य उद्योग सुरू करण्याबाबतचे अर्ज पडून आहेत. आशिया खंडातील सर्वांत मोठी एमआयडीसी बनवण्याचे स्वप्न शासनाचे आहे. येथे ५० व्यावसायिकांनी शीतगृहाची उभारणी करून फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. औद्योगिकनगर उभारण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे येथील फूल निर्यातदार व इतर व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाराजीही व्यक्त होत आहे.
औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर कर गोळा होतो.परंतु त्याचा उपयोग तेथील समस्या सोडविण्यासाठी होत नसल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. फ्लोरिकल्चर पार्कच्या मूळ आराखड्यात मान्य करण्यात आलेल्या पार्किंग, ग्रेडिंग, ट्रान्स्पोर्ट, कोल्ड स्टोअरेज, हार्वेस्टिंग यासह अन्य सुविधांची वानवा आहे.
तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांनी टाऊनशिप उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले होते.परंतु अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली पाहिजे तशा झाल्या नाहीत. नवलाख उंब्रे, नाणोली, आंबी, मंगरूळ व अन्य गावे औद्योगिकनगरात समाविष्ट नसल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. बाहेरील कामगारांमुळे या गावांतील लोकवस्ती वाढत चालली आहे. परंतु गावांना इंडस्ट्रीयल टॅक्सचा लाभ मिळत नसल्याने तेथील विकासकामेही धिम्या गतीने सुरू आहेत. या भागातील उद्योजकांना काही अडचणी निर्माण झाल्यास थेट पुणे व पिंपरी-चिंचवडला जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी टाऊनशिप होणे गरजेचे आहे.
- रामदास काकडे, उद्योजक
टाऊनशिप होणे गरजेचे आहे. या भागातील गावांचा त्यामध्ये समावेश झाल्यानंतर विकासाला गती मिळेल. शासनाने लवकरात लवकर टाऊनशिप उभारावी. - दतात्रय पडवळ, नवलाख उंब्रे गावचे सरपंच