पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, अधिका-यांना आरोग्यासाठी मिळाला वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 03:44 PM2017-09-27T15:44:15+5:302017-09-27T15:45:24+5:30
पदाधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी देणे घेणे नसून अधिका-यांच्या पदोन्नतीतच रस आहे, यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांना वेळ मिळाला.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिका-यांना नागरिकांच्या आरोग्याविषयी देणे घेणे नसून अधिका-यांच्या पदोन्नतीतच रस आहे, यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर महापालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांना वेळ मिळाला. आरोग्याविषयी महापौरांनी बैठक घेतली. शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी योग्य नियोजन करावे अशा सूचना महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.
शहर स्वच्छतेबाबत पदाधिकारी व आरोग्य विभागाची बैठक आयुक्त कक्षात झाली. त्यावेळी ते बोलत होते. मागील आठवड्यात महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अधिकारी पदोन्नतीला खोडा बसला म्हणून सभा रद्द केली होती. महापालिकेच्या सत्ताधाºयांना अधिकारी पदोन्नतीची चिंता आहे, आरोग्याचे देणे घेणे नाही, याविषयीचे वृत्त व विशेष लेख लोकमतने प्रकाशित केल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि महापौरानी तातडीची बैठक घेतली.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव , ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, फ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, ग प्रभाग अध्यक्ष अभिषेक बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सुजाता पालांडे, आशा धायगुडे-शेंडगे, अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलिप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे आदी उपस्थित होते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महापालिका परिसर व परिसरातील रस्ते यांची स्वच्छता विनाविलंब करण्यात यावी. तसेच दिवसांतून दोन वेळा कचरा उचलण्यासाठी वाहनांचे नियोजन करण्यात यावे. याकामी आवश्यकता वाटल्यास मनुष्यबळ व वाहनांची संख्या वाढविण्यात यावी, व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांनी प्रयत्न करावेत.’’
स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, ‘‘आरोग्य अधिका-यांनी स्वत: साईटवर जावून त्याबाबत प्रभागातील नगरसदस्यांना कळवावे. दिवसातून दोन वेळा कचरा उलण्यात यावा. यासाठी कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रयत्नही केले गेले पाहिजेत महापौर नितीन काळजे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दोन वेळा साफसफाई व कचरा उचलण्याबाबत नियोजन करावे.’’
व्यापारी परिसरामध्ये दोन वेळा साफसफाई करण्याचे व कचरा उचलण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधितांना दिल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षकांनी येत्या तीन दिवसांत त्यांच्या परिसरातील स्वच्छता व कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. दुरुस्ती अभावी कार्यशाळेत एकही वाहन राहता कामा नये. याची दक्षता अधिकाºयांनी घ्यावी. वर्दळीचे चौक व ठिकाणे निश्चित करुन तेथे स्वच्छता ठेवावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या