अधिकाऱ्यांची ठेकेदारी
By admin | Published: April 30, 2017 05:12 AM2017-04-30T05:12:16+5:302017-04-30T05:12:16+5:30
महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या निकटवर्तीयांची ठेकेदारी जोरात सुरू आहे. महापालिकेतील संबंधित विभागाचा अधिकारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या निकटवर्तीयांची ठेकेदारी जोरात सुरू आहे. महापालिकेतील संबंधित विभागाचा अधिकारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या निकटवर्तीयांना कामाचा ठेका मिळवून देतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात अधिकारी, कर्मचाऱ्यांची भागीदारी असते. भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा भागीदारीतील ठेकेदारीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्कळ कमाई होत आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईत आठवड्यात दोन अधिकारी सापडले असले तरी ठेकेदारीतील भागीदारीकडे व विकास कामांच्या गुणवत्तेकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय पुढाऱ्यांच्या वशिलेबाजीने अनेक कार्यकर्त्यांनी महापालिकेत नोकरी मिळवली आहे. शिवाय या नेत्यांच्या मर्जीत राहून पदोन्नतीने अधिकारीपदापर्यंत पोहोचलेले अनेक जण ठेकेदारीत गुंतले आहेत. महापालिकेच्या नालासफाईच्या कामापासून ते विविध प्रकारच्या कामासाठी आपल्या ओळखीतल्या, निकटवर्तीय लोकांना काम मिळवून देण्यात अशा अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कामाचा ठेका मिळवून दिल्यानंतर त्यातील विशिष्ट रकमेची टक्केवारी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या खिशात पडते.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकू नये, याची दक्षता म्हणून महापालिकेतील काही अधिकाऱ्यानी एजंट नेमले आहेत. एका अधिकाऱ्याने तर त्यासाठी एक महिला नेमली आहे. ही महिला प्रत्यक्ष महापालिकेत कायम स्वरूपी, अथवा मानधन तत्त्वावर नेमणुकीस नसली तरी तिचा महापालिकेत कायम वावर आहे. जनजागृतीसंबंधीची कामे त्या महिलेमार्फत दिली जातात. हा प्रकार भाजपातील पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. (प्रतिनिधी)
अनेक संस्थांत अधिकाऱ्यांचे हितसंबंध
शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम एका संस्थेला दिले. त्याचा पोलखोल स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सीमा सावळे यांनी मागील बैठकीत केला. ही संस्था महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या निकटवर्तीयाची असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या विविध उपक्रमांची जनजागृती करण्यासाठी पथनाट्य करणाऱ्या संस्था नेमल्या. त्यात काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे दिसून आले आहे.
‘जाऊ तिथे खाऊ’चे धोरण
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर गत वर्षी सोशल मीडियावर संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रसारित करण्याची सुपिक कल्पना महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आली होती. स्थायी समितीची विषयपत्रिका तयार करण्यापासून ते स्थायी समितीत होणाऱ्या चर्चेवेळी उपस्थित राहाण्याची संधी मिळालेल्या या अधिकाऱ्याने लाखोंचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला होता. विषयपत्रिकेवर या एका ठिकाणी अक्षरी पन्नास लाख तर अंकी पाच लाख असा उल्लेख करून सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकारांच्या दक्षतेमुळे त्यांचा पाच लाखांच्या प्रस्तावात ५० लाख लाटण्याचा डाव फसला. महापालिकेच्या कार्यक़्रमासाठी मंडप उभारणीचा ठेकेदार ते त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रिकरणाठी नेमण्यात येणाऱ्या संस्था आपल्याच मर्जीतल्या अशा पद्धतीने ‘जाऊ तिथे खाऊ’ असे धोरण अवलंबणारे अधिकारी महापालिकेत आहेत. त्यांच्यावर महापालिकेतील आजी माजी पदाधिकारी व आयुक्तांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
नगरसेवक-अधिकाऱ्यांचे साठेलोटे
अनेक नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या नावे महापालिकेत ठेका मिळविला आहे. नगरसेवक अथवा महापालिका अस्थापनात काम करणारी अधिकारी, कर्मचारी यांना अशा प्रकारे महापालिकेच्या विकासकामांचा ठेका घेता येत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या काळापासून अधिकारी आणि नगरसेवकांचे साटेलाटे असल्याने हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे.