PCMC च्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की; अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:22 AM2022-03-11T10:22:18+5:302022-03-11T10:23:06+5:30
महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना धक्काबुक्की...
पिंपरी : अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक गेले. त्यावेळी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना धक्काबुक्की केली. शगुन चौक, पिंपरी येथे बुधवारी (दि. ९) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
विनोदकुमार अशुदमन चंदानी (वय ४८), आशिष विनोद कुमार चंदानी (वय २१), विजय पुरुषोत्तम बलवानी (वय २१, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी आशिष आणि विजय यांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमित चंद्रकांत पवार (वय ३१) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. ९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची गाडी घेऊन पिंपरीतील शगुन चौक येथील मेनकापड बाजार येथे अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी गेले. शगुन चौकातील पर्ल कलेक्शन या कपड्याच्या दुकानासमोर कपडे विकण्यासाठी ठेवले होते. त्यामुळे फिर्यादी हे त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीला त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखून आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून आले. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना आरोपींनी धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत नमूद आहे.