ट्रान्सफॉर्मरमधून ऑईलगळती ; वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 04:01 PM2019-04-13T16:01:55+5:302019-04-13T16:06:22+5:30

शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत रोहित्र फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑईलगळती झाली.

Oil leakage from Transformer , accident avoided due to no crowd | ट्रान्सफॉर्मरमधून ऑईलगळती ; वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली 

ट्रान्सफॉर्मरमधून ऑईलगळती ; वर्दळ नसल्याने दुर्घटना टळली 

Next

पिंपरी : स्पाइन रोडवरील भाजी मंडई चौक ते शरदनगर सर्व्हिस रस्त्यावर शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत रोहित्र फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑईलगळती  झाली. त्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली. वेळीच दक्षता घेतल्याने दुर्घटना टळली. 
हे विद्युत रोहित्र शरदनगरमधील हनुमान मंदिराच्या बाजूला आहे़. मंदिराच्या भिंतीलगत रोहित्र बसविलेले आहे़. हा परिसर रहदारीचा असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. स्पाइन रस्त्याने संभाजीनगरकडून शरदनगरला येण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे़ त्यामुळे भाजी मंडई चौकाकडून भोसरीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर वाहनचालकांना करावा लागत आहे़ हे रोहित्र पदपथावर असल्याने पादचाऱ्यांनादेखील रोहित्रापासूनच ये-जा करावी लागत आहे़ बाजूलाच मंदिर असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना अशा घटनेने धोका संभवत आहे़     
रामनवमीनिमित्त येथे सप्ताह सुरू आहे़. शनिवारी रामनवमी असल्याने रामजन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते़. त्या वेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता़. परंतु, ही घटना दुपारी दोनच्या दरम्यान घडल्याने अनर्थ टळला़. हे विद्युत रोहित्र पदथावर, मंदिराच्या बाजूला तसेच रहदारीच्या ठिकाणी असल्याने धोकादायक बनत आहे़. तरी महावितरणाने याची दखल घेऊन ते त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे़.
    रोहित्रामधून मोठ्या प्रमाणात ऑईलगळती झाल्याने ते रस्त्यावर आले़ त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला़ मंदिर परिसरातील नागरिकांनी वाहनचालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला़.  ऑईलमुळे गाडी घसरून आपघात होण्याची शक्यता असल्याची जाणीव नागरिक करून देत होते़. तरीदेखील वाहनचालक ऑइल पसरलेल्या रस्त्यावरून वाहतूक करत असल्याने रोहित्राच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात ऑईल पसरले गेले़. त्यामुळे वाहन घसरून आपघात घडण्याची शक्यता वाढली आहे़.

Web Title: Oil leakage from Transformer , accident avoided due to no crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.