भाजपामध्ये नवे घेणार जुन्यांची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 03:07 AM2018-12-15T03:07:40+5:302018-12-15T03:08:02+5:30
‘पद नको, विश्वासात घ्या’ अशी मागणी करणार
पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या शहरातील जुन्या कार्यकर्त्यांनी एकजूट केली आहे. ‘पद नको, विश्वासात घ्या, असे आर्जव जुन्यांनी शहरातील पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाणार असून, त्यांची दखल पक्षश्रेष्ठी घेणार असून, याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर जुने-नवीन असा वाद सुरू आहे. मागील पंधरवड्यात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची अलिबाग येथे चिंतन बैठक झाली. त्या वेळी त्यांनी पक्षाच्या शहरातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली होती. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर केला जात नाही. याविषयी एकजूट करण्याचा निर्धार केला होता. भाजपाचा एक गट शिवसेनेच्या संपर्कात आहे, अशी चर्चाही शहरात रंगली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतली होती. पिंपरी विधानसभेची गटप्रमुख, शक्तीकेंद्र आणि बुथप्रमुखांची बैठक झाली. या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य प्रतिनिधी अमीत गोरखे, शहर सरचिटणीस अमोल थोरात, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या वेळी प्रभागस्तरीय कामाकाजाचा आढावा घेण्यात आला. कोणत्याही क्षणी निवडणूक झाली तर त्यास सज्ज असू असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ त्या वेळी काहींनी जुन्या कार्यकर्त्यांच्या विचारांना प्राधान्य दिले जात नाही, असाही आक्षेप काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ कार्यकर्ते राजू दुर्गे यांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली. ‘‘आमची नाराजी पक्षश्रेष्ठींवर नसून शहरपातळीवरील कार्यपद्धतीवर आहे. आम्ही काही महापालिकेचे ठेके मागत नाही, कामे मागत नाही. फक्त आम्हाला सन्मान द्या, आमची मते विचारात घ्या, कार्यकर्त्यांना न्याय द्या, विकासाचे निर्णय घेताना सर्वांची मते जाणून घ्या, अशी आर्जव केली. शहराध्यक्षांपर्यंत काही लोक पोहचू देत नाहीत. ही बाब शहराध्यक्षांनी विचारात घ्यायला हवी. नेत्यांचे कान हे तांब्या-पितळाचे असू नयेत. भाजपाचा विकास साधायचा आहे. शहराचा विकास करायचा आहे, त्यामुळे जुन्यांशी संवाद ठेवायला हवा़ संवाद साधताना तांब्या-पितळाचे कान बरोबर असू नयेत, अशी मागणीही केली. त्यानंतर प्रमुखांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे या वेळी सांगितले.