चिखलीत पुरात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:30 PM2018-07-16T21:30:11+5:302018-07-16T21:37:28+5:30
मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून हे वृद्ध दाम्पत्य वास्तव्य करत आहे.
चिखली : रविवार सायंकाळपासून इंद्रायणी नदीच्या परिक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी चिखली येथे इंद्रायणी नदीच्या काठावर मोई गावच्या स्मशानभूमीतही पाणी शिरले. पुरापासून बचावासाठी या स्मशानभूमीत अडकलेल्या दाम्पत्याची अग्निशामक विभागाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.
मोई गावच्या स्मशानभूमीजवळ झोपडी करुन गेल्या सात-आठ वर्षांपासून रामलखन शर्मा वय ७० वर्षे आणि मालनबाई शर्मा वय ६८ वर्षे हे वृद्ध दाम्पत्य संसारोपयोगी जुजबी साहित्य, पाच कुत्रे आणि दोन मांजरी यांच्यासह वास्तव्य करत आहे. रविवारी रात्रीपासून नदीची पाणीपातळी हळूहळू वाढत गेली. पुराचे पाणी वाढले तसे झोपडीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पुराचा धोका लक्षात घेऊन त्यांनी जवळच्या स्मशानभूमीत आसरा घेतला. पहाटेच्या सुमारास स्मशानभूमीतही पाणी शिरले. आणखी पाणीपातळी वाढल्याने स्मशानभूमीतही दोन तीन फुटापर्यंत पाणी चढले. शर्मा दाम्पत्याने स्मशानभूमीच्या लोखंडी खांबाला धरून कसाबसा तग धरला. हा सर्व प्रकार मयूर उगळे यांच्या लक्षात आला. त्यांनी ताबडतोब पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पिंपरीतील संत तुकारामनगर मुख्य अग्निशामक केंद्र व तळवडे अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करून दोन बोटी मागविण्यात आल्या आणि पुरात अडकलेल्या शर्मा कुटुंब तसेच कुत्र्यांची एकापाठोपाठ एक करत सुखरूप सुटका केली.
बचाव पथकातील अधिकारी ऋषिकेश चिपाडे, लिडिंग फायरमन अशोक इंगोले, वाहनचालक पद्माकर बोरावके, शहाजी कोपनर, नितिन कोकरे, महेंद्र पाठक, सुभाष घोडके, नाथा शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गारठल्याने वृध्द दाम्पत्यावर उपचार
रामलखन आणि मालनबाई शर्मा यांना बचाव करण्यासाठी प्रयत्न केलेल्या मयूर उगळे यांनी त्यांची पुरातून सुटका केली. पावसात भिजल्याने वृध्द दाम्पत्य गारठले होते. त्यामुळे ते थंडीने कुडकडत होते. या वृद्ध दाम्पत्याला चिखलीतील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून मोई येथील मंदिरात तात्पुरते राहण्याची व्यवस्था करत माणुसकीचे दर्शन घडविले.