त्या पोलिसांची ओली पार्टी... कार्यकर्त्याने व्हिडीओ केला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 08:20 PM2018-04-03T20:20:23+5:302018-04-03T20:20:23+5:30
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला.
पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे येथे चाकण पोलिसांची व्हॅन थांबवून तुम्ही मद्य प्राशन केले आहे, अशा स्थितीत वाहन चालवू नका, असे सांगण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका सामाजिक कार्यकर्त्याने केला. पोलिसांचे वाहन थांबवून त्यांच्याशी हुज्जत घालत असल्याचे मोबाइलवर चित्रीकरण केले. त्याची व्हिडीओक्लिप फेसबुकवर व्हायरल केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कार्यकर्त्याविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. योगेश मालखरे असे त्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
देहूरोड पोलिसांकडे सरकारी कामात अडथळा आणल्याचा तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. काळेवाडीतील एका सामाजिक कार्यकर्त्यासह त्यांच्या अन्य साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महामार्गावर किवळे येथून एस्कॉर्ट ड्युटीवर जात असताना पोलीस वाहनचालक बी. के. साबळे (चाकण पोलीस ठाणे), तसेच हवालदार सोनवणे यांना कार्यकर्त्याने अडविले. बाजूला त्याची मोटार (एमएच ४६ बीबी ७३६१) थांबवली. जवळ येऊन तुम्ही आॅन ड्युटी पोलीस कर्मचारी आहात, तरीही मद्यपान करून वाहन चालवीत आहात असा आरोप केला. अशा अवस्थेत तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. अशा भाषेत पोलिसांशी अरेरावी करू लागला. एवढेच नव्हे, तर त्याचे सहकारी या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण केले. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.