Video: पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:54 PM2022-06-14T17:54:37+5:302022-06-14T17:56:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील दौऱ्यानिमित्त महिला पोलिसांना बंदोबस्तासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागले
पिंपरी : वट पौर्णिमेनिमित्त सुवासिनींकडून वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू येथील दौऱ्यानिमित्त महिलापोलिसांना बंदोबस्तासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे त्यांना वडपूजन करणे सहज शक्य नव्हते. असे असतानाही काही महिलापोलिसांनी ऑनड्यूटी असतानाच पूजन केले. इतर महिलांनी त्यासाठी त्यांना मदत करीत त्यांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम केला.
‘ड्यूटी फर्स्ट’ या तत्त्वानुसार पोलिसांना कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे ते २४ तास ऑनड्यूटी असतात. महिला पोलिसांनाही त्यांचे कर्तव्य महत्त्वाचे असते. कुटुंबियांकडूनही त्यांना पाठिंबा मिळत असतो. तसेच समाजाकडूनही त्यांच्या कर्तव्याची दखल घेतली जाते.
देहू येथील शिळा मंदिर सोहळ्यानिमित्त तळवडे येथील कॅनबे चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यात एक महिला पोलीस कर्मचारी देखील होती. त्यावेळी काही महिला या चौकात वडाचे पूजन करण्यासाठी आल्या. बंदोबस्तावरील महिला पोलीस या सुवासिनींचे निरीक्षण करीत होती. ही बाब एका सुवासिनीने टिपली. त्यांनी पोलीस असलेल्या महिलेला त्यांनी आवाज दिला. पूजा करायची आहे का, असे विचारले. त्यामुळे बंदोबस्तावरील महिलेने देखील लागलीच वडाचे पूजन करून वट पौर्णिमा साजरी केली.
पिंपरीत महिला पोलिसांचे ऑनड्युटी वडपूजन #Pune#VatPurnimapic.twitter.com/cgum2B5xho
— Lokmat (@lokmat) June 14, 2022
बंदोबस्तावरील इतर महिला पोलिसांनी देखील ठिकठिकाणी खाकी वर्दीतच वडाचे पूजन केले. सौभाग्याच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असे सांगत आम्ही ‘यमा’चाही ‘बंदोबस्त’ करू संदेश या महिला पोलिसांनी दिला. वाहनचालक व सामान्य नागरिकांनीही याचे कौतूक केले.