Pimpri Chinchwad: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने देहूरोडचा सराईत गुंड आकाश पिल्ले स्थानबध्द
By नारायण बडगुजर | Published: May 4, 2024 06:40 PM2024-05-04T18:40:42+5:302024-05-04T18:41:05+5:30
जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे असे एकूण १५ गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत...
पिंपरी : देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या सराईत गुंडाला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचेपोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले. आकाश अरमुगम पिल्ले (२४, रा. देहूरोड) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे. पाेलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश याने स्वतःची टोळी बनवून त्यामाध्यमातून देहूरोड, किवळे परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले.
यात जबरी चोरी, दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे असे एकूण १५ गंभीर गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्याला पुणे शहर, पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून एक वर्षाकरीता तडीपार केले होते. तरीही तडीपार कालावधी दरम्यान आकाश पिल्ले याने देहूरोड परिसरामध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करून गंभीर गुन्हे केले. त्यामुळे देहूरोड परिसरामध्ये त्याची दहशत निर्माण झाली. त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामन्य नागरिक भीतीमुळे उघडपणे आकाश याच्या विरुध्द तक्रार देण्यास धजावत नव्हते.
आकाश याची दहशत मोडून काढण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची सूचना दिली. त्यानुसार देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांनी प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची गांभिर्याने दखल घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. २) आदेश दिले. त्यानुसार आकाश पिल्ले याला शुक्रवारी (दि. ३) ताब्यात घेऊन ‘एमपीडीए’ कायद्यान्वये येरवडा कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द केले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त बापू बांगर, देहरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलिस अंमलदार अनिल जगताप, धीरज अंभोरे, शुभम बावनगर, स्वप्नील साबळे यांनी ही कामगिरी केली.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सरूच राहणार आहे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड