मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:26 AM2017-11-04T04:26:26+5:302017-11-04T04:26:34+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. पाच सप्टेंबरला शिक्षक सत्कार समारंभ होतो़ मात्र, या वर्षी हा मुहूर्त हुकला.

Once the ministers get the time, the teacher award ceremony, invitations to the magazine include the Guardian Minister | मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश

मंत्र्यांना वेळ मिळताच मुहूर्त, शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम, निमंत्रण पत्रिकेत ऐनवेळी पालकमंत्र्यांचा समावेश

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत. पाच सप्टेंबरला शिक्षक सत्कार समारंभ होतो़ मात्र, या वर्षी हा मुहूर्त हुकला. त्यानंतर मागील महिन्यात सोहळ्याचे नियोजन झाले. मात्र, मंत्र्यांना वेळ नसल्याने कार्यकम रद्द केला. त्यानंतर दोन महिन्यांनी मुहूर्त सापडला आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात रविवारी हा कार्यक्रम होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे असणार आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाते. त्यानिमित्त पालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जात असतो.
जून महिन्यात शिक्षण मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यामुळे नवीन समिती होण्याची वाट महापालिकेतील पदाधिकारी पाहत आहेत. या विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पाच सप्टेंबरला शिक्षक दिनादिवशी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिक्षक दिनाला मोठे महत्त्व आहे. आम्हाला पालिकेकडून दुसरी कोणती
अपेक्षा नाही. फक्त शिक्षक दिनादिवशी शिक्षकांचा सन्मान केला जावा, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
नियोजनाचा कार्यक्रमाला फटका
चिंचवड, येथील आॅटो क्लस्टर सभागृहात गेल्या महिन्यात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रांगोळी टाकण्यात आली. रंगमंचही सजविण्यात आला. सत्कारार्थीही कार्यक्रमास आले. मात्र, शिक्षणमंत्र्यांना वेळ नसल्याने कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली होती. आता येत्या रविवारी शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
परंतु, रविवारी तरी कार्यक्रम होईल
की नाही याबाबत शिक्षकांमध्ये साशंकता आहे.
गुणवंत शिक्षक पुरस्कारात एकूण २१ पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये प्राथमिक शाळांना आठ पुरस्कार, खासगी प्राथमिक शाळांना नऊ पुरस्कार, तर खासगी माध्यमिकला चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच खासगीच्या दोन व महापालिकेच्या दोन शाळांना पुरस्कृत केले जाणार आहे.
सध्या या प्रकरणाची पालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम लांबला होता. हा कार्यक्रम ५ सप्टेंबरला होणे अपेक्षित होते. परंतु हा कार्यक्रम लांबला आहे. त्यातच पत्रिकेची अदलाबदल यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

परंपरा ठेवली कायम : पत्रिकेतील नावांवरून राजकारण

१महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पत्रिकेत नावांचे राजकारण करण्याची परंपरा राष्टÑवादी काँग्रेसप्रमाणेच भाजपानेही कायम ठेवली आहे. राष्टÑवादीच्या कालखंडात त्यांच्या नेत्यांची नावे ठळक असत. आता भाजपाच्या नेत्यांची नावे ठळकपणे दिली जात आहेत. शिक्षक दिनाच्या पत्रिकेत राजकारण केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार पदाधिकाºयांची नावे टाकण्यात येत नाही. भाजपाच्या नेत्यांची नावे ठळक टाकून इतर पक्षाच्या नेत्यांवर अन्याय केला जात आहे. विशेष उपस्थिती ही एक नवी संकल्पना सत्ताधाºयांनी काढली आहे.
२खासदारांपेक्षा भाजपा आमदारांची नावे ठळक केली जातात. तसेच ती प्रोटोकॉलनुसार नसतात. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि खासदार अमर साबळे यांचे नावे विशेष उपस्थिती आणि ठळकपणे दिले आहेत. मात्र, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, राष्टÑवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार गौतम चाबुकस्वार यांची नावे प्रमुख उपस्थितीमध्ये दिली आहेत. भाजपाचे नेते आणि शिवसेनेचे, राष्टÑवादीचे नेते यांच्या फॉन्टमध्ये आणि अक्षरांच्या आकारातही फरक केला आहे.

महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी अहमदाबाद दौºयावर गेले असताना, प्रशासनाने शिक्षकांच्या गुणगौरव समारंभाची पत्रिका गुरुवारी वितरित करण्यास सुरुवात केली. त्या पत्रिकेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे नावच प्रसिद्ध केले नव्हते. ही बाब सत्ताधाºयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्रीत पत्रिका बदलली आणि नवीन पत्रिकेत पालकमंत्र्यांचे नाव प्रसिद्ध केले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे हजारो पत्रिका फेकून द्याव्या लागल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

Web Title: Once the ministers get the time, the teacher award ceremony, invitations to the magazine include the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.