पिंपरीत गुटखा विक्रीप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:53 PM2019-08-02T15:53:02+5:302019-08-02T15:53:20+5:30
गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला किंवा पानमसाला तयार होऊ शकेल असे पदार्थ, तसेच त्यांची विक्री करण्यावर बंदी आहे.
पिंपरी : बंदी असतानाही गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका विक्रेत्यास अटक करण्यात अली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिर चौकात गुरुवारी (दि. १) सकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमचंद रामचंद कृपलाणी (वय ५०), व दिनेश तुलसीमल तीरथाणी (दोघेही रा. पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी खेमचंद कृपलाणी याला पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे (वय ५५, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.
गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला किंवा गुटखा तसेच पानमसाला तयार होऊ शकेल असा पदार्थ , सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी, तंबाखू इत्यादिचे उत्पादन, साठा, वितरण तसेच विक्री करण्यावर बंदी आहे. असे असतानाही आरोपी गुटखा विक्री करीत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अरुण धुळे यांना मिळाली. त्यानुसार पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिर चौकात छापा मारून आरोपी कृपलाणी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एका टेम्पोसह १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आदी मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.