दृष्टीहीन रिना पाटील झाल्या एक दिवसाच्या पिंपरी पोलीस आयुक्त; कृष्ण प्रकाश यांनी दिला बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 05:21 PM2021-01-27T17:21:51+5:302021-01-27T17:24:10+5:30
पिंपरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त 'सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी' हा उपक्रम राबविला.
पिंपरी : नागरिक आणि पोलीस यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसाचा पोलीस अधिकारी हा उपक्रम राबविला. दृष्टीहीन असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त, एकल माता ज्योती माने एक दिवसाच्या अपर आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर पोलीस उपायुक्त बनला. या सुखद धक्क्यामुळे ते तिघेही भारावून गेले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मंगळवारी दुपारी हा सोहळा झाला. पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. पोलीस दलातील बँड पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला. कृष्ण प्रकाश यांनी रिना पाटील यांच्याकडे आयुक्तपदाचा एक दिवसाचा पदभार दिला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविला. पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांचा देखील एक दिवसाचा पदभार विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर याच्याकडे देण्यात आला. तसेच या तिघांनाही पोलिसांचे कामकाज समजावून सांगण्यात आले.
एक दिवसाच्या पोलीस आयुक्त रीना पाटील म्हणाल्या, ‘‘पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. कुठलाही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात हे त्यांचं मोठेपण आहे. कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.’’
अपर पोलीस आयुक्त झालेल्या ज्योती माने म्हणाल्या, ‘‘पतीचे निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. तरुण मुलीचा सांभाळही करायचा होता. अशा परिस्थितीत फक्त पोलिसांनी जगण्याचं बळ वाढवलं. अन्याय झाल्यास महिलांनी पोलिसांची मदत घ्यावी.’’
पोलीस उपायुक्त (गुन्हे) झालेला दिव्यांशु तामचिकर म्हणाला, ‘‘मी अभ्यास करून चांगल्या गुणांनी पास झालो. आता महाविद्यालयात जाईल. भविष्णात खूप मेहनत करून मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणूनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार. मला आमच्या समाजाची मानसिकता बदलायची आहे.’’
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, ‘‘कायदे आणि व्यवस्थेपेक्षा संविधान मानणाऱ्या नागरिकांमुळे कुठलाही देश चालतो, प्रगती करतो. आपल्या लोकशाहीचा गर्व वाटतो. नागरिकांनाही आमचे काम समजले पाहिजे आणि त्यांनीही आमच्या प्रति संवेदशीलता दाखवली पाहिजे.’’