एका तासात विद्यार्थ्यांनी 2 लाख 30 हजार कागदी पिशव्या बनविण्याचा केला जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:34 PM2017-12-18T19:34:48+5:302017-12-18T19:35:10+5:30
प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
लोणावळा : प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये शाळेच्या 3 हजार 657 विद्यार्थ्यांनी एक तासात तब्बल 2 लाख 30 हजार 373 कागदी पिशव्या बनविण्याचा जागतिक विक्रम तयार केला आहे. वर्ल्ड रेकाॅर्ड आॅफ इंडिया गुजरात या संस्थेच्या पदाधिकार्यांनी या जागतिक रेकाॅर्डची घोषणा करत शाळेला प्रमाणपत्र देऊन गौरविले. वर्ल्ड रेकाॅर्ड आॅफ इंडिया गुजरात या एनजीओचे चीफ एडीटर पवन सोलंकी व इव्हेंट मॅनेजर मेघा क्रिश्चन यांच्या निरिक्षण व पर्यवेक्षणाखाली हा उपक्रम आज पार पडला.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष बच्चुभाई पत्रावाला, मुख्याध्यापक सुधरेंद्र देशपांडे, उपप्राचार्य मारुती तारु, उपमुख्यध्यापिका श्रीमती मधुमालती संधीर, शिक्षकेत्तर कर्मचारी भगवान आंबेकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते. पिशव्या बनविण्याकरिता आवश्यक असणारे वृत्तपत्रांचे कागद व गम शाळेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आले होते. शाळेच्या पटांगणात वर्गवारी प्रमाणे विद्यार्थी गोलाकार बसून पिशव्या बनविण्यात मग्न झाले होते. मुलांमध्ये देखिल जास्तीत जास्त पिशव्या बनविण्याची स्पर्धा लागली असल्याचे चित्र पहायला मिळाले. बनविलेल्या कागदी पिशव्या ह्या शहरातील मेडिकल दुकानदारांना भेट देण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सुधरेंद्र देशपांडे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये कागदी पिशव्या बनविण्याबाबत जागृकता निर्माण होण्यासोबत प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा हा संदेश देखिल देण्यात आला. सध्या प्लास्टिकमुळे निर्सगाची मोठी हानी होत असून प्लास्टिक निर्मूलन करण्याचे मोठे आवाहन सरकारपुढे आहे. भविष्यात कागदी पिशव्या हा प्लास्टिकवर रामबाण उपाय ठरु शकतो असे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमाचे मुख्य सुत्रधार समन्वयक व अविष्कार फाऊंडेशनचे दीपक पिसे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.