सळई मारल्याने एक जखमी, दुचाकी पार्कींगवरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:45 AM2018-11-11T01:45:52+5:302018-11-11T01:45:56+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश धनराज बजाज (वय २८, पिंपरी) असे फिर्यादीचे नाव आहे. अतुल पवार ऊर्फ चांड्या
पिंपरी : मिलिंदनगर येथील घराजवळ मोकळ्या जागेत उभी केलेली मोटार तेथून हलवावी, असे सांगत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपी व त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी फिर्यादीला लोखंडी सळई मारून जखमी केले. एकाने डोक्यात वीट मारली. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश धनराज बजाज (वय २८, पिंपरी) असे फिर्यादीचे नाव आहे. अतुल पवार ऊर्फ चांड्या (वय २६), हर्ष (बाबा) जुमानी (वय ३२), बॉक्सर (वय २२) तसेच अमोल श्रीवास्तव, राहुल टोणपे, अनिल ऊर्फ चिमिच, रोअरा व साथीदार अशा सात आरोपींविरोधात पिंपरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार आरोपी अतुल पवार फिर्यादी मुकेश यांना मोटार बाजूला घेण्यास सांगू लागला. त्या वेळी त्याने शिवीगाळ केली. अतुल यास हर्ष याने लोखंडी सळई दिली. अतुलने त्या सळईने फिर्यादीला मारहाण केली. आखणी एकाने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारली. आरोपीच्या इतर साथीदारांनीही मारहाण केली. त्यात मुकेश गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
अज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. शेरबहादूर काशीराम भंडारी (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
शेरबहादूर भंडारी गुरुवारी सकाळी भोसरी एमआयडीसीतून पायी जात होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीची (वाहन क्रमांक, एमएच १४, इपी ७१४९) त्यांना जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत शेरबहादूर यांचे नातेवाईक असलेल्या नमन उदयसिंग बिस्टा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळचा रा. नेपाळ) यांनी फिर्याद दिली आहे.