पिंपरीत लोखंडी सज्जा कोसळून हिंजवडीत एक ठार, ३० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 04:30 PM2017-09-25T16:30:52+5:302017-09-25T16:31:09+5:30
हिंजवडी फेज ३ मध्ये मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळला या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्यामध्ये ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. अजब लाल (वय ४५) असे मृत मजुराचे नाव आहे.
पिंपरी, दि. २५ - हिंजवडी फेज ३ मध्ये मजुरांसाठी उभारलेल्या पत्रा शेडचा लोखंडी सज्जा कोसळला या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर त्यामध्ये ३० ते ३५ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. अजब लाल (वय ४५) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी कामगार वसाहत उभारणारा कंत्राटदार, सुरक्षा व्यवस्थापक बालाजी नागराजन तसेच पर्यवेक्षक यांच्यावर सुरक्षिततेबद्दल हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल अॅन्ड डब्ल्यू या कन्स्ट्रक्शन साईटच्या मजुरांना राहण्यासाठी पत्राशेड बांधून देण्यात आले असहेत. हे पत्राशेड सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आले. त्यातील पाच ब्लॉकमध्ये ८० खोल्या होत्या, एका खोलीत १० ते १५ असे ८० खोल्यांमध्ये १ हजाराहून अधिक लोकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
रविवारी रात्री खाणावळीत जेवणावरून किरकोळ वादावादी झाली. भांडणाचा आवाज ऐकुन पहिल्या मजल्यावरील तसेच तळमजल्यावरील कामगार बाहेर आले. ज्या लोखंडी सज्ज्यावर ते उभे होते तो लाखंडी सज्जा अधिक भार आल्याने कोसळला. त्यामध्ये सुमारे ३० कामगार किरकोळ जखमी झाले. अजब लाल (वय 45 ) या कामगाराच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर हिंजवडी व वाकडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.