पिंपरीत क्रेडिटकार्डचा गैरवापर करून एक लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:20 PM2018-08-28T14:20:08+5:302018-08-28T14:21:11+5:30
क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवुन त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली.
पिंपरी : वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या निकेत अशोक बाचल (वय ३१) यांच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी मिळवुन त्याआधारे प्राप्त झालेल्या पासवर्डचा वापर करून आरोपींनी बाचल यांच्या बँक खात्यातील एक लाख रुपये रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली. याप्रकरणी आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार चिंचवड पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील वाल्हेकरवाडीचे रहिवासी अनिकेत बाचल यांची आरोपीबरोबर इंटरनेटवर चॅटिंग करण्यातून ओळख झाली. आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा ओटीपी क्रमांक मिळविला. पासवर्ड मिळताच मोबाईल वॅलेट खातेधारक आरोपी राधा गुप्ता याने फिर्यादीच्या खात्यावरील एक लाख रुपयांची रक्कम त्याच्या मोबाईल वॅलेट खात्यावर वर्ग केली. ज्या मोबाईलच्या माध्यमातुन हा प्रकार घडला, तो मोबाईलधारक उदय तिलक असून या दोन आरोपींनी फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख रुपये दुसऱ्या खात्यावर वर्ग केले असल्याचा एसएमएस मोबाईलवर आला. त्यावेळी आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी याआरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.आरोपी परप्रांतिय आहेत. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.