पिंपरी-चिंचवडमध्ये वाढला एक रूग्ण, संख्या २३ वर; सात जणांचे अहवाल निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 09:15 PM2020-04-09T21:15:46+5:302020-04-09T21:16:28+5:30
चोवीस तासात दोन रूग्णांची वाढ
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आठ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यानंतर उर्वरित सात जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. तर ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. शहरातील रूग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोराना पॉझिटिव्ह आणि संशयित रूग्णांचा आकडा वाढत आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे शहरातील आठ जणांचे अहवाल बुधवारी आले नव्हते. हे अहवाल गुरूवारी सांयकाळी आले. त्यात एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर उर्वरित सात जणाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चोवीस तासात दोन रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे.
गुरूवारी महापालिकेच्या रूग्णालयांत चाळीस रूग्ण दाखल झाले आहेत. चाळीस रूग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविले आहेत. तर २४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकुण रूग्ण तेवीस झाले असून एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले,आजच्या अहवालात एक जण पॉझिटिव्ह आला आहे. तर ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले आहेत. हे अहवाल प्रतिक्षेत आहेत.