वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये; देहू देवस्थानने व्यक्त केली नाराजी
By विश्वास मोरे | Published: January 18, 2024 06:20 PM2024-01-18T18:20:59+5:302024-01-18T18:22:18+5:30
साधुसंतांनी पारमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तनाची वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नाही
पिंपरी: वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये, या संदर्भातील आवाहन देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे. अनेक दूरचित्रवाहिन्यांवर किर्तन, प्रवचनांचे कार्यक्रम होत आहेत. मात्र, त्यात वारकरी आचारसंहितेचे पालन केले जात नाही. याबाबत अनेक वारकरी संप्रदायातील संस्थांनी तसेच देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय दामोदर मोरे, भानुदास अंकुश मोरे, संतोष नारायण मोरे, माणिक महाराज गोविंद मोरे, अजित लक्ष्मण मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, सध्या अनेक दूरचित्रवाहिन्यांवर वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम प्रसारित होत आहे. त्यामध्ये काही ठिकाणी कीर्तन सादर होताना वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. वारकरी कीर्तन करण्याचे वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नाही, असे दिसून येत आहे. हे खूप गंभीर आहे. साधुसंतांनी पारमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कुणीही करू नये.