कामशेत येथे चुकीच्या कामामुळे एका युवकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:26 PM2019-05-07T14:26:41+5:302019-05-07T14:27:24+5:30
जुना पुणे- मुंबई महामार्गावर पवनानगर फाटा हा अनेक वर्षांपासुन वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता.
कामशेत : जुना पुणे- मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या व कामाच्या चार मुदत संपूनही पूर्ण होत नसलेल्या भरवाच्या उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. त्यात दोन ठिकाणी रस्ता दुभाजला आहे. याठिकाणी डायव्हर्जनचे कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावण्यात आले नसल्याने वारंवार अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालक युवकाचा रस्ता समजुन न आल्याने खड्यात पडुन मृत्यु झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ( दि.७) रोजी जुना पुणे मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे मुंबई पुणे लेनवर पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून ( क्र. एम एच ४७ ए इ २८५९) जाणारा विवेक विलास सुवारे ( वय २५ रा. गोरेगाव, मुंबई) हा युवक पुढील रस्ता न समजल्याने मातीच्या ढिगाऱ्यातुन सुमारे २०० फुट दुचाकी फरफटत जाऊन खड्यात पडुन अपघात झाला. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला असुन याची माहिती सकाळी साडेसहाच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या माणसांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.
जुना पुणे- मुंबई महामार्गावर पवनानगर फाटा हा अनेक वर्षांपासुन वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. येथील उड्डाणपुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून या कामाची मुदत चार वेळा संपूनही काम पूर्ण झाले नाही. शिवाय दोन भागात मुख्य रस्ता दुभाजुन सेवा रस्त्यावर वाहतुक वळवण्यात आली आहे. मागील महिन्यात असाच एक अपघात झाला असुन आत्तापर्यंत येथेच सुमारे दहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत. मात्र येथे सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक लावण्यात आले नसल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने वारंवार येथे अपघात घडून अनेकांचे बळी गेले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत.