कोरोनामुळे बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:23 PM2020-05-13T15:23:09+5:302020-05-13T15:23:34+5:30
कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाऊल
किवळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला ग्राहक मिळत नाही. परिणामी कांदयाचा बाजारभाव खूपच कमी झाला असल्याने किन्हई व परिसरातील काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी साठवण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात कांदा गरजेची बाब झाला आहे. रोजच्या जेवणात कांदयाचा मुबलक वापर करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर सर्व पदार्थात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. कांद्याचे औषधी गुणधर्म हेही कांदा वापरातील महत्वाचे कारण आहे. कांद्याचे बाजारभाव कमी जास्त होत असल्याने ग्राहक कांदे खरेदी करताना काळजी घेत असल्याचे दिसून येते. तसेच बाजारात आलेले ओले कांदे घेण्यापेक्षा साठवण केलेला व चांगला वाळलेला कांदा खरेदीस प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे भाजीपाला बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला विक्रीवर सर्वत्र विविध बंधने घालण्यात येत आहेत. बाजारात कांद्याला ग्राहक मिळत नाही . त्यामुळे कांद्याचे बाजार आणखी कमी होत चालले आहेत. बाजारभावाचा फटका शेतक?यांना बसत असल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. तापमान बदलामुळे पोषक वातावरण न मिळाळ्यास कांद्याचे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवण करण्यास सुरुवात केली आहे. कांदा साठवण केल्याने कांद्याला बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रीसाठी आणून काही प्रमाणात फायदा मिळविणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
कांदा साठवण करणे हे अत्यंत जोखमीचे आहे. साठवण करताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब झाल्यास फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या बाजारात उठाव नसल्याने भावात घसरण झालेली आहे. त्यामुळे तोटा घेऊन विकण्यापेक्षा साठवण केल्यास पुढे फायदा होऊ शकतो . बाळासाहेब दिवसे , कांदा उत्पादक शेतकरी व कृषी मित्र , किन्हई