ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:41 PM2023-03-09T13:41:46+5:302023-03-09T13:41:55+5:30
विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी
पिंपरी : सलग दोन वर्षे शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होता. या ऑनलाइन पद्धतीमुळे हस्तलेखनाचा सराव मोठ्या प्रमाणात कमी झाला. आता दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी लिखाणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागत आहे. उत्तरे लिहिण्यासाठी वेळ पुरत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी करू लागले आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून सर्वच विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव न राहिल्याने परीक्षा देताना त्यांची मोठी कसरत होते आहे. मात्र, हे आव्हान पेलण्याचे कसब विद्यार्थ्यांना दाखवावे लागणार आहे. ऑनलाइनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन सुरू झाले. बहुतांश विद्यार्थी सध्या घरात बसूनच ऑनलाइन अभ्यास करू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सलग तीन तास लिहिण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
लिखाणाचा सराव आवश्यक...
हस्तलेखनाबाबतीत विद्यार्थ्यांनी वेळीच दक्षता बाळगून लिखाणाचा सराव करावा, म्हणजे त्यांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
यावर्षी असणार असे बदल!
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, यावेळी परीक्षेत काही बदल करण्यात आले आहेत. ज्यात गेल्यावर्षी परीक्षेसाठी देण्यात आलेली होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. सोबतच दहावी-बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहत आहे.