पेटीएम केवायसी संपल्याचे सांगून एक लाख ३० हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 04:01 PM2020-03-08T16:01:25+5:302020-03-08T16:03:15+5:30
पेटीएमची केवायसी मुदत संपल्याचे सांगत एकाच्या खात्यामधून 1 लाख 30 हजार रुपये लंपास केल्याची घटना समाेर आली आहे.
पिंपरी : ‘पेटीएम’ केवायसी मुदत संपली असल्याचे सांगून डेबीट कार्डचे डिटेल्स मागितले. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करून अलाऊ करण्यास सांगितले. त्यानंतर एक लाख २९ हजार ६९३ रुपये बँकेच्या खात्यातून ट्रान्सफर करून घेऊन फसवणूक केली. मुकाई चौक, किवळे येथे २३ डिसेंबर २०१९ ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
सुरेश गोरोबा साबळे (वय ५२, रा. मुकाई चौक, किवळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. पेटीएमची केवायसी संपली आहे. ती अपडेट करून घेण्यासाठी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगून त्यात एक मोबाइल क्रमांक नमूद करण्यात आला होता. फिर्यादी यांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता आरोपी याच्याशी त्यांचे बोलणे झाले. पेटीएमच्या उत्तरप्रदेशमधील नोएडा येथील कार्यालयातून मी बोलत आहे, असे सांगून आरोपी याने फिर्यादी यांच्याकडून डेबीट कार्डची माहिती मागितली. फिर्यादी यांनी डेबीट कार्डची सर्व माहिती दिली. त्यानंतर आरोपी याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. त्यावर क्लिक करण्यास सांगून त्यावर एक कोड येईल त्याला अलाऊ करा, असे आरोपी याने फिर्यादी यांना सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी अलाऊ केले.
त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून नऊ हजार ९८९ रुपये कट झाल्याचे तीनदा मेसेज आले. एकूण २९ हजार ६९४ रुपये खात्यातून ट्रान्सफर झाल्याचे फिर्यादी यांनी आरोपी यांना फोन करून सांगितले. पैसे चुकून ट्रान्सफर झाल्याचे आरोपी याने सांगितले. ते पैसे तुमच्या खात्यात जमा करतो, त्यासाठी तुमच्या दुसऱ्या खात्याची माहिती द्या, असे आरोपी म्हणाला. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी पुन्हा त्यांच्या दुसऱ्या खात्याच्या डेबीट कार्डची माहिती आरोपी याला दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या त्या दुसऱ्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये ट्रान्सफर झाले. आपली फसवणूक झाली आहे, असे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.