ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 05:14 PM2019-08-25T17:14:36+5:302019-08-25T17:36:07+5:30
पॅन्ट परत करण्यासाठी केलेल्या मेसेजच्या आधारे 65 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची तक्रार हिंजवडीमध्ये समाेर आली आहे.
पिंपरी : ऑनलाइन खरेदी केलेली पॅन्ट परत करून ग्राहकाने पैशांची मागणी केली. पैसे परत पाठविण्याचे सांगून मोबाइलवरून एक कोड मॅसेज केला. तो मॅसेज पुन्हा दुसऱ्या मोबाइलवर पाठविण्यास सांगितला. त्यानुसार ग्राहकाने मॅसेज पाठविल्यानंतर त्याच्या बँकेच्या खात्यातून ६५ हजार ८१४ रुपये ऑनलाइन काढून घेऊन फसवणूक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अभिषेक कुमार नाचनकर (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी नाचनकर यांनी एका वेबसाईटवरून पॅन्ट खरेदी केली. साईजमध्ये नसल्याने ती पॅन्ट परत करून सदरच्या वेबसाईटवर तक्रार करून पैशांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी सदरच्या वेबसाईटशी संपर्क साधण्यासाठी इंटरनेटवरून संपर्क क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार राहुल या इसमाचा क्रमांक त्यांना मिळाला. पॅन्टचे पैसे परत पाठवायचे कारण सांगून राहुल याने फिर्यादी नाचनकर यांच्या मोबाइलवर एक मॅसेज पाठविला. तो मॅसेज पुन्हा दुसऱ्या एका मोबाइल क्रमांकावर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने तो कोडचा मॅसेज पाठविला. त्यानंतर फिर्यादी नाचनकर यांच्या बँक खात्यातून ६५ हजार ८१४ रुपये ऑनलाइन काढून घेऊन आरोपीने फसवणूक केली. हिंजवडीचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार तपास करीत आहेत.