आयटी पार्कमधील ऑनलाइन जुगाराचा डाव उधळला; मायलेकासह आठ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:00 PM2024-01-22T14:00:55+5:302024-01-22T14:01:46+5:30
पिंपरी : चक्क भाड्याने खोली घेत ऑनलाइन जुगाराचा डाव रंगत असल्याचा प्रकार हिंजवडी आयटी पार्कमध्ये समोर आला आहे. हिंजवडी ...
पिंपरी : चक्क भाड्याने खोली घेत ऑनलाइन जुगाराचा डाव रंगत असल्याचा प्रकार हिंजवडी आयटी पार्कमध्ये समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत पाच लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी फेज १ येथे माण रस्त्यावरील हाॅटेल कॅपिटल डिलक्स लाॅज येथे शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही कारवाई केली.
रावसाहेब गजानन बनसोडे (२५, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ रा. सोलापूर), यश गंगाराम नाकनवरे (२१, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, मूळ रा. भीमा कोरेगाव, शिक्रापूर, जि. पुणे), प्रज्योत प्रकाश कुचेकर (२४, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ रा. सोलापूर), शुभम गणेश मोरे (२३, रा. पिंपळे गुरव), आशिष अशोक घटमल (२८, रा. बेबड ओहोळ, ता. मुळशी, मूळ रा. आंबेजोगाई, जि. बीड), आकाश संजय आडागळे (२४, रा. राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव) यांना सीआरपीसी कलम ४१(१)(अ) प्रमाणे त्यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यांच्यासह तनीश गोयल आणि दीपाली गोयल (दोघेही रा. वल्लभनगर बस स्थानक जवळ, पिंपरी) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली गाेयल आणि तिचा मुलगा तनीश गोयल यांनी हिंजवडी आयटी पार्क फेज १ येथे हाॅटेल कॅपिटल डिलक्स लाॅज येथे भाडेतत्त्वावर खोली घेतली. तेथे काही कर्मचाऱ्यांना लॅपटाॅप तसेच मोबाइलवरून काही ॲप्लिकेशन दिले. तसेच व्हाटसअप उपलब्ध करून दिले. ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी अनेक जण व्हाटसअप क्रमांकावरून गोयल यांच्याकडील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत होते. जुगार खेळण्यासाठी पैसे मागवून घेऊन कर्मचारी त्यांच्याकडील जुगाराच्या ॲप्सवर संबंधित मोबाइलधारकाचे खाते सुरू करून देत होते. त्यानंतर दिलेल्या रकमेतून त्यांना ॲप्सवर ऑनलाइन जुगार खेळता येत होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल सुरू होती.
सहा लॅपटाॅप, १५ मोबाइल जप्त
दरम्यान, ऑनलाइन बेटिंगबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. यात लाॅजवर छापा मारला असता एका खोलीत सहा जण बेटिंग घेताना मिळून आले. तसेच सहा लॅपटाॅप आणि १५ मोबाइल असा एकूण पाच लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. खोलीत मिळून आलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल करत सीआरपीसी कलम ४१(१)(अ) प्रमाणे पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. दीपाली गोयल आणि तनीश गोयल यांनी या सहा जणांकडून ऑनलाइन बेटिंग करून घेतली, असे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दीपाली आणि तनीश यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे तपास करीत आहेत.