शहरातील परदेशी नागरिकांची होणार ऑनलाईन नोंदणी; पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:53 PM2021-02-13T19:53:35+5:302021-02-13T19:54:04+5:30

पोलिसांकडून परकीय नागरिक विभाग होणार कार्यान्वित

Online registration of foreign citizens in the city; Facility from the Commissionerate of Police | शहरातील परदेशी नागरिकांची होणार ऑनलाईन नोंदणी; पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा

शहरातील परदेशी नागरिकांची होणार ऑनलाईन नोंदणी; पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा

Next

पिंपरी : शहरात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या नोंदणीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेकडून परकीय नागरिक विभाग (एफआरओ) आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील परकीय नागरिकांची संख्या, त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण, कालावधी, कामाचे स्वरुप आदीबाबत शहर पोलिसांना माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात तळवडे सॉफ्टवेअर पार्क तसेच हिंजवडी-माण आयटी पार्क आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीचा (एमआयडीसी) मोठा परिसर असून, राष्ट्रीय व बहूराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने आहेत. तसेच पर्यटन, शिक्षण व व्यवसायाच्या अद्ययावत सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे परदेशी नागरिकांचा शहरात राबता आहे. या नागरिकांची शासकीय यंत्रणेकडे नोंद असते. मात्र स्थानिक पातळीवर देखील या नागरिकांबाबत माहिती असावी, यासाठी पोलिसांच्या स्थानिक आस्थापनेकडून त्यांची नोंद केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरातील परकीय नागरिकांची नोंदणी सध्या पुणे येथे होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी चारित्र्य पडताळणीची सुविधा शहर पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा पुढचा टप्पा म्हणून परकीय नागरिकांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक पोलीस निरीक्षक, दोन अधिकारी, आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच ही सुविधा आॅनलाईन असल्याने त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.
शहरात येणाऱ्या परकीय नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पोलिसांच्या या विभागाकडे त्यांची नोंद करता येणार आहे. तसेच त्यांच्या देशात परत जाताना देखील त्याबाबतची नोंद करता येणार आहे. त्यामुळे व्हिसाची मुदत संपल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या परकीय नागरिकांचा शोध घेणे स्थानिक पोलिसांनासहज शक्य होणार आहे.

गुन्हेगारीतील परकियांची नोंद
परदेशातून आलेल्या काही परकीय नागरिकांकडून शहरात गुन्हेगारी कृत्य होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी, मटका, जुगार अशा अवैधधंद्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परकीय नागरिकांची तत्काळ नोंद घेऊन परराष्ट्र मंत्रालय तसेच संबंधित शासकीय यंत्रणेला स्थानिक पोलिसांकडून माहिती दिली जाते. त्यानुसार परकीय नागरिकांची नोंद घेऊन पुढील कार्यवाही व कारवाई केली जाते.

Web Title: Online registration of foreign citizens in the city; Facility from the Commissionerate of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.