होळीसाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री, मागणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 09:09 PM2018-02-27T21:09:06+5:302018-02-27T21:26:39+5:30
आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.
- स्वप्नील हजारे
पिंपरी-चिंचवड : आधुनिक काळातही होळी या सणाचे महत्व कायम आहे. पारंपारिक पद्धतीने साज-या होणा-या होळीसाठी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांची अग्नी पेटवून त्याची पूजा केली जाते. झपाट्याने होणा-या शहरीकरणामुळे गाई व जनावरांचे गोठे गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी गोव-यांची आॅनलाइन विक्री सुरू झाली आहे.
देशभरात खेड्यांसह शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी पेटवून मनोभावे अग्नी देवतेची पूजा केली जाते. होळीच्या ठिकाणी सुवासिनी नैवेद्य दाखवतात. वर्षानुवर्षे या सणाचे महत्त्व टिकून आहे. वाईट विचार नष्ट करून चांगल्या विचाराचा अंगीकार करणे या भावनेतून होळीचा सण साजरा केला जातो.
होळीसाठी लागणा-या साहित्याची विशेष म्हणजे गाईच्या शेणापासून बनविण्यात येणा-या गोव-यांना फार महत्त्व असते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना गोव-या उपलब्ध होत नाही. विविध वस्तूंची आॅनलाईन विक्री करण्यात अग्रेसर असणा-या काही कंपन्यानी चक्क गोव-यांची आॅनलाईन विक्री सुरू केली आहे. होळीप्रमाणेच धार्मिक विधी, होमहवन याकरिता गोव-यांना मोठी मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन काही कंपन्यानी आॅनलाइन गोव-या विक्रीची जाहिरात केली आहे.
खेड्यातील गोव-यांना मागणी...
खेड्यामध्ये घरोघरी शेतक-याकडे गाई, म्हशी असतात. या जनावरांच्या शेणापासून गोव-या तयार करून स्वंयपाकासाठी इंधन म्हणून वापरात आणल्या जातात. उन्हाळ््यात घराच्या आवारात अथवा शेतात महिलावर्ग शेणाच्या गोव-या थापतात. ऐन पावसाळ््यात साठा केलेल्या गोव-यांचा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर होतो. या गोव-यांना आॅनलाइनच्या बाजारपेठेत एवढे महत्व येईल, असे शेतक-यांना कधीच वाटले नव्हते. परंतु आता शेतक-यांकडील गोव-यांना चांगलाच भाव आला आहे.
नऊ गोव-यांसाठी १५० रुपये...
गोव-याची नगाने विक्री होत आहे. नऊ गोव-याची किंमत दीडशे ते दोनशे रूपये असून या गोव-याची काही दिवसात होम डिलीवरी मिळण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे. विविध कंपनीच्या संकेतस्थाळावर गोव-याची किंमत वेगवेगळी असली, तरी आॅनलाइन गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-याची विक्री होतेय, हे नवल राहिलेले नाही. विशेष म्हणजे आकर्षक पॅकिग असणा-या विविध आकारातील गोव-यांना आॅनलाइन ग्राहकही मिळू लागला आहे. शहरात सर्वकाही आॅनलाईन आणि घरबसल्या खरेदी करणारा ग्राहक आता गोव-याही आॅनलाइन खरेदी करू शकणार आहे.