Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह!
By विश्वास मोरे | Published: May 13, 2024 09:55 AM2024-05-13T09:55:32+5:302024-05-13T09:56:05+5:30
निवडणूक आयोगाच्या वतीने नागरिकांनी मतदानास यावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत
पिंपरी: मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानास सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. तर सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सुमारे टक्के मतदान झाले. सकाळच्या टप्प्यामध्ये अल्प प्रतिसाद, निरुत्साह दिसून आला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानास सुरुवात झाली. सकाळी नऊपर्यंत मतदानाचा टक्का कमी असल्याचे दिसून आले. मावळच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये हा टक्का कमी असल्याचे निवडणूक आयोगाचे मत आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रावर सुमारे १२ हजार मतदार अधिकारी, कर्मचारी सज्ज आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर ८३ सूक्ष्म निरीक्षक तैनात आहेत. मतदानासाठी १ हजार ९५८ बॅलेट युनिट, ७५० कंट्रोल युनिट आणि ७८८ व्हीव्हीपॅट सज्ज ठेवण्यात आली होती.
निवडणूक आयोगाकडून मतदान होण्यासाठी प्रयत्न
निवडणूक आयोगाच्या वतीने नागरिकांनी मतदानास यावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. हरित मतदान केंद्र, सेल्फी पॉईंट, पिंक सखी मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. चिंचवड विधानसभाअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरता वाहतूक सुविधा ३० रिक्षा वेगवेगळ्या ठिकाणी सेवेकरता उपलब्ध करून दिल्या आहेत महात्मा फुले इंग्लिश मीडियम स्कूल दळवी नगर दिव्यांग मतदार केंद्र, चिंचवड विधानसभा दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मावळमधे मॉक पोलचे वेळी २४ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेसाठी सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.