स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलाराज असूनही लोकसभेसाठी परवड, मावळमध्ये एकच महिला उमेदवार
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 30, 2024 04:51 PM2024-04-30T16:51:35+5:302024-04-30T16:52:29+5:30
मावळमधील महिला नेत्यांमध्ये निवडणूक लढविण्याबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे....
पिंपरी : राजकारणात महिलांना संधी देण्याची केवळ चर्चा केली जाते. देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेत. मात्र, त्या तुलनेत महिला खासदार नाहीत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मावळमध्ये नेतृत्त्व करण्याची संधी महिलांना मिळालेली नाही. यंदाच्या निवडणूकीत ३३ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये फक्त एकमेव महिला उमेदवार आहे. मावळमधील महिला नेत्यांमध्ये निवडणूक लढविण्याबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना २००९ ला झाली. मावळमध्येही आतापर्यंतचे तिन्ही खासदार हे पुरुषच झालेले आहेत. या ठिकाणचे खासदार मुख्य आणि मोठ्या राजकीय पक्षांचेच राहिलेले आहेत. थोडक्यात युती आणि आघाडीत सामील असलेल्या आताच्या राज्यातील मुख्य आणि मोठ्या पक्षांनी व पूर्वीच्याही पक्षांनी मावळमध्ये महिला उमेदवार देण्यात अन्याय केला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही फक्त एकाच महिलेला संधी दिली आहे. फक्त वंचितने माधवी जोशी यांना उमेदवारी दिली आहे.
ग्रामपंचायत, पालिकेत महिलाराज...
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह मावळातील ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्के महिलाराज आहे. मात्र, मावळसह पिंपरी-चिंचवड कामगारनगरीची पहिल्या खासदाराची आस अद्यापही कायम आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का कमी असला तरी महिलांची संख्या आणि त्यांचे प्रश्न आजही कायम आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मोजक्याच महिला उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शहरातील उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत अवघी ६-७ टक्के मते या महिला उमेदवारांना मिळाली आहेत.
राजकीय पक्षांचे दुर्लक्ष -
लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याबाबत राजकीय पक्षाची अनास्था आहे, महिला सक्षमीकरणाची नुसतीच चर्चा केली जाते. महिलांना उमेदवारीतून बळ देण्याबाबत मावळ लोकसभेतील नेत्यांची अनास्था आहे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे महिलांचे मत आहे.
२००९ मध्ये एकूण उमेदवार १८ , उमेदवारी मिळालेल्या महिला - १
२०१४ मध्ये एकूण उमेदवार २०, उमेदवारी मिळालेल्या महिला - ३
२०१९ मध्ये एकूण उमेदवार २२, उमेदवारी मिळालेल्या महिला - २
२०२४ मध्ये एकूण उमेदवार ३३, उमेदवारी मिळालेल्या महिला - १