Pimpri Chinchwad: उघड्यावर कचरा टाकणे महागात पडले; व्यावसायिकाला ७० हजारांचा दंड
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: October 26, 2023 05:40 PM2023-10-26T17:40:25+5:302023-10-26T17:41:55+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रिय आरोग्य विभागाच्या वतीने मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी ते कोलोशीस रोडवर उघड्यावर जैव वैद्यकीय घनकचरा टाकल्याबद्दल दोन वैद्यकीय व्यावसायिकांकडून ७० हजार रुपयाचा तर डेंग्यू अळ्या आढळल्याबद्दल एका व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांचा दंड असा ८० हजार रुपयांचा दंड आज करण्यात आला.
ही कारवाई आज सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे आणि अमर सूर्यवंशी यांच्या पथकाने चिखली मोशी परिसरात केली. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. मंगलम क्लिनिक चिखली व समर्थ क्लिनिक मोशी या दोन्ही वैद्यकीय व्यावसायिकाला प्रत्येकी ३५ हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला.