आयटी पार्कजवळील रस्ते खुले करा - पालकमंत्री गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:29 AM2017-09-16T02:29:00+5:302017-09-16T02:29:19+5:30
हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्कच्या समस्या विशेषत: वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी सकाळी परिसराची पाहणी केली. म्हाळुंगे येथून दौरा सुरूकेला होता. आयटी पार्कशी संबंधित रस्ते लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी खुले करणे गरजेचे आहे. त्यामुळे हिंजवडीतील वाहतुकीचा ताण कमी होईल. आयटीयन्सचा प्रवासदेखील सुखकर होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. येथील वाहतूककोंडीबाबत ‘लोकमत’ने गेले दोन दिवस वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री बापट यांनी पाहणी केली.
सकाळी म्हाळुंगे येथील मर्सिडिझ बेन्झ-शेडगे वस्ती, शेडगे वस्ती-कुमार बिल्डर, म्हाळुंगे पूल, म्हाळुंगे पूल ते साखरे वस्ती, तसेच हिंजवडी-माण-फेज ३ रस्त्याची पाहणी व नव्याने मुळा नदीवर हिंजवडी म्हाळुंगेला जोडणाºया पुलाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. तसेच माण-चांदे रस्त्याची देखील पाहणी त्यांनी या वेळी केली. आयटीयन्सना पार्किंगसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, यासाठी १२ हजार चौरस फूट बहुमजली इमारत बांधून त्यात आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. पीएमआरडीएचे किरण गित्ते यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत माहिती दिली. हिंजवडी ते बालेवाडी मेट्रोचा पहिला टप्पा असून, मार्च २०१९ पर्यंत हा टप्पा पूर्ण करण्यावर प्राधान्य देण्यात येत असून, पुढील भाग काही कारणामुळे लांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मेट्रो तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे ध्येय पूर्ण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, नगरसेवक शत्रुघ्न काटे, तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी स्मिता पाटील,आयटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पै, कर्नल चरांजीत बागल, नवनाथ पारखी, राम वाकडकर, दादा मोहोळ, सुनील भरणे, श्याम हुलावळे उपस्थित होते.
अभियंता दिनीच सुनावले खडे बोल!
पालकमंत्री बापट म्हाळुंगे-हिंजवडी पुलाची पाहणी करत होते़ सदर पूल १४ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे. मात्र, या पुलाचे काम सुरू असताना म्हाळुंगेच्या दिशेने जाणारा रस्ता आश्चर्यकारकरीत्या मोठ्या प्रमाणात वळवण्यात आल्याचे बापट यांच्या निदर्शनास आले. सदर बाबीची सखोल माहिती घेत असताना इंजिनिअर समाधानकारक उत्तर देत नसल्याने बापट यांनी त्यास चांगलेच धारेवर धरले. मी इंजिनिअर नसूनही माझ्या निदर्शनास आलेली ही मोठी चूक तुमच्या ध्यानी का आली नाही? अशा चुकांमुळेच अपघाताचे प्रमाण वाढेल असे, बापट या वेळी म्हणाले. या घटनेची चर्चा मात्र येथील ग्रामस्थ दिवसभर करत होते.