चोरट्यांना प्रतिकार केल्याने दहा लाखांची रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:05 PM2019-04-18T16:05:47+5:302019-04-18T16:07:21+5:30
टाटा मोटर्स कंपनीच्या चारचाकी पार्किंगसमोरुन रस्ता ओलांडत असताना भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले...
पिंपरी : मनी एक्स्चेंज करण्यासाठी दहा लाखांची रोकड घेवून जाणाऱ्या तरुणावर चोरट्याने कोयत्याने वार करुन रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोयत्याने वार करुनही तरुणाने चोरट्यांचा प्रतिकार केल्याने रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना बुधवारी भरदिवसा दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरीतील टाटा मोटर्स कंपनीजवळ घडला.
मोहन आढागळे असे चोरट्यांचा प्रतिकार केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप रामभाऊ गायकवाड (वय ४८, रा. सदगुरु क्लासिक, न्यु, अहिरेगाव, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (१७ मार्च) दुपारी साडेतीनच्या सुमारास गायकवाड व त्यांचे मित्र मोहन आढागळे हे त्यांच्या कार्यालयातर्फे मनी एक्स्चेंज करण्यासाठी भारतीय चलनाच्या १० लाख रुपयांच्या नोटा घेवून जात होते. दरम्यान, टाटा मोटर्स कंपनीच्या चारचाकी पार्किंगसमोरुन रस्ता ओलांडत असताना भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गाने दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडविले.
मोहन यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मोहन यांनी प्रतिकार केला असता तिघा आरोपींपैकी एकाने मोहन यांच्या हातावर कोयत्याने वार केला. त्यामध्ये ते जखमी झाले. दरम्यान, चोरट्याने मोहन यांच्याकडील मोबाईल लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.