केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅली, सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 06:51 PM2018-12-05T18:51:53+5:302018-12-05T19:00:12+5:30
केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे.
देहूरोड : केंद्र सरकारच्या संरक्षण उद्योगातील खाजगीकरण, नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेसह चुकीच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी देहरोड व तळेगाव दाभाडे परिसरातील केंद्रीय संरक्षण विभागातील विविध आस्थापनांतील कामगारांच्या एआयडीएफ, इंटक व बीपीएमएसच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने देहूरोड परिसरातून रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला कामगारांचा मोठा प्रतिसाद लाभला.
केंद्र सरकारने केंद्रीय संरक्षण विभागातील विविध उत्पादन खासगी कंपन्यांना देण्यासह खाजगीकरण करण्यावर भर दिला असून हा निर्णय घेतलेला आहे. तसेच सन 2004 नंतर भरती झालेल्या संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केली असून जुनीच पेन्शन योजना कामगार हिताची असल्याने नवीन योजना तातडीने रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी सर्वच कामगार संघटना करीत असून विविध कामगार संघटनांच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाल्यानुसार सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोघात देहूरोड येथील एम बी कॅम्प , शंकर मंदीर, पुणे-मुंबई महामार्ग , सुभाष चौक व देहूरोड बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नेहरु मंगल कार्यालयापर्यंत संबंधित सर्व सहभागी कामगार संघटनांच्या सयुंक्त कृती समितीने रॅली काढली होती. रॅलीत मोठया संख्येने सहभागी झालेल्या कामगारांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली . पंडीत नेहरु मंगल कार्यालयासमोरच्या मैदानात सभा घेण्यात आली . सभेत देहूरोड विभागातील संरक्षण कामगार प्रतिनिधी निस्सार शेख यांनी प्रास्तविक केले. बीपीएमएसचे प्रतिनिधी प्रल्हाद नवगिरे, इंटकचे प्रतिनिधी प्रमोद जोशी, एआयडीएफचे प्रतिनिधी योगेश कोंडाळकर आदींनी सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत , खाजगीकरण व पेन्शन योजनेबाबत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची माहिती देऊन चुकीचे धोरण रद्द करण्यार्चा मागणी केली. पंडित बालघरे यांनी आभार मानले.