पिंपरी स्थायी समितीच्या बैठकीस विरोधक अनुपस्थित; राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 08:49 PM2021-09-01T20:49:10+5:302021-09-01T20:49:47+5:30
आंदोलन असल्याने प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात
पिंपरी : स्थायी समितीतील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर पहिली सभा बुधवारी झाली. अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी सभा घेतली. सुमारे चाळीस कोटींच्या विकासकामांना मान्यता दिली. सभेस सत्ताधारी भाजपचे सदस्य सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, शिवसेनेचे एक असे पाच जणांचा अघोषित बहिष्कार असल्याचे दिसून आले.
कामाचा आदेश मिळविण्यासाठी लाच घेताना स्थायीचे स्वीय्य सहायकांसह पाच जणांना एसीबीने अटक केली होती. त्यामुळे मागील सभा झाली नव्हती. सोमवारी अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज स्थायी समिती सभा झाली.
आंदोलन असल्याने प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. बुधवारच्या सभेच्या विषयपत्रावर २९ विषय होते. ही सभा होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, अध्यक्ष लांडगे सभेला दुपारी ते महापालिका मुख्यालयात आले. चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स रुममधून त्यांनी ऑनलाइन सभा घेतली. मागील आठवड्यातील तहकूब आणि आजची दोनही सभा घेतल्या. मागच्या सभेतील एक विषय तहकूब केला. सभेत केवळ सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी सभेवर अघोषित बहिष्कार घातला आहे.
............................................
गणेशोत्सव काळामध्ये विसर्जनासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहनांवर विसर्जनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार ५० पेक्षा जास्त वाहने ठेवावीत, अशा सूचना अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी केल्या.
.............................
हल्ल्याचा निषेध
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा बैठकीत निषेध केला.अशा प्रकारची घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडू नये याकरिता आयुक्तांना सूचना दिल्या. अतिक्रमण कर्मचा-यांचे मनोधैर्य वाढावे याकरीता पुरेसा बंदोबस्त त्यांना पुरविण्यात यावा, अशाही सूचना केल्या.
........................................
विरोधीपक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ‘‘आजच्या स्थायी समितीच्या बैठकीस उपस्थित राहू नये, अशा सूचना स्थायी समिती सदस्यांना केल्या होत्या. महापालिकेतील कारभाराविरोधात आंदोलन केले.’’