पिंपरी महापालिकेच्या प्रभाग समिती सभेत कचऱ्यावरून प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:44 PM2019-07-17T13:44:49+5:302019-07-17T13:47:13+5:30
रस्त्यावरील खड्डे आणि कचºयांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली.
पिंपरी : प्रभागस्तरावरील अडचणी व विकासकामांबाबतचा आढावा घेण्यासाठी क प्रभागात बैठक झाली. प्रभाग समितीत कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. रस्त्यावरील खड्डे आणि कचºयांच्या प्रश्नावर नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. ‘‘शहरातील विविध ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावावे व कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या व फेऱ्या वाढाव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले.
प्रभाग समितीच्या बैठकीला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, नगरसदस्या नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य गोपीकृष्ण धावडे, सागर हिंगणे, वैशाली खाडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफळे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, रवींद्र पवार, नितीन देशमुख, प्रदीप पुजारी, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर,आर. एम. घुले, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले,‘‘कचरा वेळच्यावेळी उचलणे, कचरा वाहतूक गाड्यांची संख्या वाढवून फेऱ्या वाढविणे, ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक लावणे, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घेऊन सर्व शाळा स्वच्छ ठेवणेबाबत विशेष लक्ष द्यावे.’’
मोकळ्या जागांवर कुंपणालगत वृक्षलागवड करण्याबाबतच्या सूचनाही उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे यांना महापौरांनी दिल्या.
......
रस्त्यावरील खड्डे बुजवा , पदाधिकाऱ्यांना सूचना
स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले,‘‘कचरा वाहन मॉनीटरिंग करणारे अॅप विकसित करून सर्व नगरसदस्यांना द्यावे, जेणेकरून त्यांना प्रभागातील कचरा वाहक गाड्यांची सर्व माहिती मिळणे शक्य होईल. तसेच कचरा वाहनांच्या रूट प्लॅनचे पत्रक प्रभागातील नगरसदस्य, संबंधित अधिकारी यांच्या मोबाइल नंबरसह नागरिकांना घरोघरी वाटावे. कचरा वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात वृक्षलागवडीबाबत सर्व सदस्यांना माहिती द्यावी व अशा ठिकाणी नगरसदस्यांच्या भेटीचे नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे योग्य पद्धतीने तत्काळ बुजविण्यात यावेत.’’