दिवसाआड पाण्यास सर्वपक्षीय विरोध; पवना धरणात पुरेसा साठा असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:20 AM2018-03-23T05:20:18+5:302018-03-23T05:20:18+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली.
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक असताना महापालिका प्रशासन दिवसाड पाणीपुरवठा करण्याचे धोरण राबवित आहे़ या प्रश्नाबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक झाली. त्या वेळी दिवसाआड पाणीपुरवठ्यास सत्ताधाºयांनी विरोध केला. पाणीपुरवठा सुरळीत करा, दिवसाआड करू नये, अशा सूचना प्रशासनास दिल्या. त्यामुळे दिवसाआड पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे.
महापालिकेला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराला ४६० एमएलडी पाणीपुरवठा होता. गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसेवक, नागरिक आणि सत्ताधाºयांनी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर होऊ लागली असून, एकाही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सूतोवाच महापालिका प्रशासनाने केले होते. त्यामुळे महापौरांनी महापालिकेत अधिकाºयांची आज तातडीने बैठक बोलावली होती.
या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.
- पिण्याच्या पाण्याच्या तक्रारींसंदर्भात आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याचा साठा किती आहे. याची माहिती घेतली. धरणात पुरेसा साठा असतानाही शहरातील नागरिकांच्या तक्रारी कशा काय येत आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. तक्रारींची सोडवणूक व्हायलाच हवी. पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यायला हवी. धरणात पुरेसे पाणी आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी करून नागरिकांना वेठीस धरू नका, अशा सूचना महापौरांनी दिल्या.