पिंपरी महापालिकेत डॉक्टरांच्या विषयावरून सत्ताधारी भाजपमध्ये वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:23 AM2020-08-22T11:23:21+5:302020-08-22T11:23:33+5:30
कोरोनाच्या काळातील डॉक्टरांच्या कायम करण्यावरून गोंधळ
पिंपरी : डॉक्टरांना कायम करण्याच्या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या विषयावरून सत्ताधारी भाजपमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा विरोध नसतानाही सत्ताधाऱ्यांमधील गोंधळामुळे डॉक्टरांचा विषय २६ आॅगस्टपर्यंत तहकूब ठेवला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.आजच्या सभेत डॉक्टर भरती प्रक्रिया आणि डॉक्टरांना कायम करण्याच्या विषयावरून सत्ताधारी भाजपात मतभेद असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील रुग्णसेवेवरून टीका केली.
उपमहापौर तुषार हिंगे यांनी डॉक्टरांसह रुग्णालयातील स्टॉफ नर्स, घंटागाडी कर्मचारी, सुरक्षारक्षक, अॅम्ब्युलन्स चालक अशा सर्वांनाच कायम करावे, अशी उपसूचना दिली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे कोरोना कालखंडातील कामाचे कौतुक करताना सदस्यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाच्या गलथानपणावर हल्ला चढविला. डॉक्टरांच्या विषयावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कोविडच्या काळात यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आलेले बरे-वाईट अनुभव सांगितले. तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील वादांमुळे झालेले नुकसान यावर प्रकाश टाकला. तसेच रुग्णालयांचे प्रमुखांच्या शैक्षणिक अर्हता, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होणारे दुर्लक्ष यावर आक्रमकपणे भाषणे केली. डॉ. पवन साळवे हे अकार्यक्षम असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांचा पदभार काढून घ्यावा. डॉ. अनिल रॉय यांच्याकडे पदभार द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
डॉक्टरांच्या विषयास विरोध नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी वैद्यकीय विभागातील दोष सभागृहासमोर मांडले. डॉक्टरांचा विषय आजच करायचा की नाही? यावरून भाजपात मतभेद दिसले. महापौरांचे मते आजच डॉक्टरांचा विषय मंजूर करावा, असे होते. मात्र, सभागृहातील भाजपाचे काही सदस्य यावर सर्वसमावेशक चर्चा करून निर्णय घ्यावा, याबाबत आग्रही होते. सभेत योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, नितीन काळजे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, सीमा साळवे, आशा शेडगे, संदीप वाघेरे, विकास डोळस, सुजाता पलांडे, बाळासाहेब ओव्हळ यांनी मते मांडली.
‘कोविडच्या काळात डॉक्टर हे देवदूत आहेत. त्यांचा विषय करण्यास हरकत नाही. या विषयास अनुसरून अन्य कोणत्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश करायचा याबाबत गटनेत्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. तोपर्यंत २६ आॅगस्टपर्यंत सभा तहकूब करावी, अशी सूचना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मांडली. त्यानंतर सभा तहकूब केली.