महिलेवर अत्याचार; चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:27 AM2018-03-07T03:27:11+5:302018-03-07T03:27:11+5:30
औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
पिंपरी - औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. १८ दिवसांच्या कालावधीत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार झाले.
गुदरलेल्या प्रसंगाची तिने हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. आरोपींवर बलात्कार, तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेन ऊर्फ संबू राजू तुरिया (वय २०, मूळचा आसाम, सध्या रा. हिंजवडी), अजय जगदीश तिवारी (वय ३५, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मारुंजी), निपीन, टारझन अशी आरोपींची नावे आहेत. जितेन तुरिया हा पीडित महिला काम करते त्या कंपनीत सुपरवायझरचे काम करतो. तर अजय तिवारी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो. पीडित महिला मूळची गुजरात, अहमदाबाद येथील असून, एक वर्षापासून ती पती व चार मुलींसह मारुंजीत राहत होती. जितेन तुरिया याने महिलेला घरभाडे देण्याचे आमिष दाखविले. तिला रिक्षात बसवून बावधन परिसरातील एका खोलीत नेले. धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
दुसºया दिवशी कात्रज परिसरातील एका सदनिकेत नेले. तेथे डांबून ठेवून वेळोवेळी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार २४ डिसेंबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८पर्यंत सुरू होता. १२ जानेवारीला आरोपी जितेन याचे मित्र निपीन व टारझन यांनी तिला मोटारीत बसवून मारुंजीतील जंगलात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. ५ मार्चला पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.